राजापुरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या शतकपूर्ती श्रीगणेशाचे पालखीतून आगमन

राजापूर (वार्ताहर): येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या यंदाच्या शतकपूर्ती महोत्सवात प्रतिष्ठापीत करण्यात येणाऱ्या श्री मूर्तीचे रविवारी पारंपारिक पध्दतीने पालखीतून मिरवणुकीने उत्सव स्थळी आगमन झाले.
यंदाच्या या उत्सवातील श्री मूर्ती मूर्तीदाता सौ. राधिका रमेश गुणे यानी दिली आहे. शनिवारी सायंकाळी श्रींची आगमन मिरवण काढण्यात आली. श्री विठ्ठल मंदिर पासून बाजारपेठ जवाहरचौक मार्गे समर्थनगर येथील उत्सवस्थळी ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत श्री. जडयार मंडळी हर्डी यांचा भजनमेळ, श्री धूतपापेश्वर नाडणकरवाडी, पवार मंडळ ढोलपथक धोपेश्वर यांनी साथ केली.
शहरातील समर्थनगर श्री मारूती मंदिर धर्मशाळेत १३ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत हा महोत्सव साजरा होत आहे. या काळात विविध धार्मिक, सामाजिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. सोमवार दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना होऊन उत्सवाला प्रारंभ होणार आहे.या आगमन मिरवणुकीत मंडळाचे अध्यक्ष महेश मयेकर यांसह पदाधिकारी तसेच गणेशभक्त सहभागी झाले होते.