गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘एआय-रोबो इनोव्हेशन्स फेअर-२०२५’ उत्स्फूर्त प्रतिसादासह संपन्न

रत्नागिरी: वर्ल्ड कॉम्प्युटर लिटरेसी डे – २०२५ च्या औचित्याने गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त), रत्नागिरी येथील संगणकशास्त्र विभागात ‘एआय-रोबो इनोव्हेशन्स फेअर -२०२५’ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. दि. ५ डिसेंबर २०२५ रोजी हे प्रदर्शन उत्साहात पार पडले. या प्रदर्शनीला विद्यार्थी, शिक्षक आणि बाहेरील शैक्षणिक संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

द्वितीय वर्ष संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी या फेअरमध्ये ‘आर्टिफिशीयल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि आयओटी ऑटोमेशनवर आधारित विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. या प्रदर्शनामध्ये तरुणांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पकता आणि तांत्रिक कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन पाहायला मिळाले.

या नाविन्यपूर्ण प्रदर्शनाला गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील बी.एम.एस., बॅफ, बी.कॉम., बी.एस्सी. (गणित, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र), बी.बी.ए., प्रथम वर्ष कला, तसेच सुयश इ. ११ वी, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, राष्ट्रीय छात्र सेना, पदव्युत्तर विभाग यांसारख्या विविध विभागांतील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी भेट दिली. याव्यतिरिक्त, शिर्के प्रशालेतील सुमारे ६० विद्यार्थी आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यातील तसेच श्रीमान भागोजी विधी महाविद्यालयातील सुमारे ८० विद्यार्थ्यांनीही उत्साहाने भेट देऊन प्रकल्पांविषयी जाणून घेतले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि संगणकशास्त्र आणि माहितीतंत्रज्ञान विभागाच्या समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे यांनी प्रदर्शनाला विशेष उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रोजेक्ट मॉडेलचे रिअल लाईफमध्ये प्रत्यक्ष कार्यान्वयन करण्याचे तसेच भविष्यात पेटंट घेण्याचे आव्हान दिले.

प्रदर्शनाला भेट दिलेल्या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या नवोपक्रम, तांत्रिक ज्ञान आणि प्रत्यक्ष कार्यक्षमता याची मनापासून प्रशंसा केली. महाविद्यालयीन स्तरावर या प्रदर्शनाचे कौतुक होत असून विद्यार्थ्यांना मोठा प्रोत्साहनात्मक प्रतिसाद मिळत आहे. या यशस्वी आयोजनासाठी संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे आणि विभागातील सर्व प्राध्यापक व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.