हुंबरठ येथे तिघा प्रवाशांकडून बेदम मारहाण; दोन्ही पायांच्या पोटरीवर वार करून कारसह चालकाला सोडून पलायन
कणकवली : गोव्याला जाण्यासाठी भाड्याने घेतलेल्या कारच्या चालकाला बेदम मारहाण करून त्याच्या दोन्ही पायांच्या पोटरीवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना गणेश चतुर्थीच्या आदल्या रात्री मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हुंबरठ येथे घडली. रविवार १३ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. रेहान इकबाल सय्यद (वय ३२, रा. वागूवाडा, राजापूर, जि. रत्नागिरी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या कारचालकाचे नाव आहे. हल्ल्यानंतर तिन्ही प्रवासी कार घटनास्थळीच सोडून पसार झाले असून कणकवली पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी १३ सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास रेहान इकबाल सय्यद यांच्याकडे तीन अनोळखी प्रवासी आले. आपल्याला गोव्याला जायचे असून त्यासाठी भाड्याने कार हवी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार रेहान यांनी आपल्या ताब्यातील स्विफ्ट कार (एमएच ४३ एजे ६१८९) भाड्याने दिली. तिन्ही प्रवाशांना घेऊन रेहान हे रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास राजापूर येथून गोव्याच्या दिशेने निघाले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना कणकवली तालुक्यातील हुंबरठ येथे रेहान यांनी लघुशंकेसाठी कार थांबवली. यावेळी कारमध्ये असलेल्या तिन्ही प्रवाशांनी पुढील प्रवासात कार आपण चालवतो, असे रेहान यांना सांगितले. मात्र, रेहान यांनी कार आपणच चालवणार असल्याचे सांगत कार चालविण्यास नकार दिला. यावरून चालक आणि तिन्ही प्रवाशांमध्ये वादावादी झाली.
वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. तिन्ही प्रवाशांनी रेहान यांना बेदम मारहाण केली. त्यातील एका प्रवाशाने रेहान यांच्या दोन्ही पायांच्या पोटरीवर चाकूने वार केले. या हल्ल्यात रेहान जखमी होऊन रस्त्यावर पडले. त्यानंतर तिन्ही हल्लेखोरांनी रेहान यांना आणि स्विफ्ट कारला घटनास्थळीच सोडले आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तेथून पलायन केले.
दरम्यान, नांदगावहून कणकवलीच्या दिशेने पेट्रोलिंग करून जात असलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांना रेहान हे राष्ट्रीय महामार्गावर जखमी अवस्थेत विव्हळत पडलेले दिसून आले. त्यांनी तातडीने ही माहिती कणकवली पोलीस ठाण्यात दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव, एपीआय गणेश पवार, पीएसआय प्रितेश पाटील, हवालदार शिवगण आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी रेहान यांना तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
प्राथमिक उपचारानंतर रेहान यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी त्यांना राजापूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, घटनेतील स्विफ्ट कार पोलिसांनी ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात आणली आहे. कारचालकावर हल्ला करून पसार झालेल्या तिन्ही प्रवाशांचा कणकवली पोलीस शोध घेत आहेत. हल्लेखोरांची ओळख, हल्ल्यामागील नेमके कारण तसेच घटनेचा संपूर्ण तपशील पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.












