देवरूख (प्रतिनिधी):
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने मतदार जनजागृती रॅली व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. मतदार जनजागृती रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून पवार नाका या मार्गावर रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी “मतदान करा, लोकशाही बळकट करा”, “मतदानाचा हक्क बजावा, लोकशाहीचा मान वाढवा” अशा विविध जनजागृतीपर घोषणा देत नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागृती केली. त्यानंतर पाटगाव येथील सांब मंदिराजवळ स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी परिसरातील प्लॅस्टिक व इतर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला. स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी असून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या दोन्ही उपक्रमात ५३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सुनील सोनावणे, प्रा. अनिकेत ढावरे, प्रा. सीमा कोरे, प्रा. स्वप्नाली झेपले आणि प्रा. वसंत तावडे यांनी विशेष मेहनत घेतली. मतदार जनजागृतीसोबतच स्वच्छतेचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणारा ठरला.












