मुरडव येथे गणपती सजावटीदरम्यान विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

देवरूख (प्रतिनिधी):

गणेशोत्सवाच्या आनंदात सजावटीचे काम करत असताना विजेचा तीव्र धक्का लागून संगमेश्वर तालुक्यातील मुरडव-सुतारवाडी येथील ३६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुहास विष्णू केळकर असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे मुरडव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सुहास केळकर हे आपल्या घरी गणपती सजावटीचे काम करत होते. सजावटीसाठी विजेचे आकर्षक तोरण लावत असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. विजेचा धक्का लागल्याने ते जागीच कोसळले. घटना लक्षात येताच त्यांचे भाऊ स्वप्निल विष्णू केळकर यांनी तातडीने सहस यांना वाहनातून आरवली येथील डॉ. भायजे यांच्याकडे उपचारासाठी नेले. प्राथमिक तपासणीनंतर त्यांना पुढील उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले.

 

मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सुहास केळकर यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीसांनी बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, आकस्मिक मृत्यू क्रमांक ३८/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या सणासुदीच्या काळात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे मुरडव गावासह सुतारवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.