सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिटप्रकरणी उद्या कोल्हापूर सर्किट खंडपीठात सुनावणी

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील ट्रामा केअर युनिट तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात आरोग्य विभागाने दिलेल्या हमीपत्राबाबत गुरुवारी (ता. १७) कोल्हापूर सर्किट खंडपीठात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीदरम्यान आरोग्य संचालकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हिसी) उपस्थित राहावे, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेप्रकरणी अ‍ॅड. महेश राऊळ न्यायालयात बाजू मांडणार आहेत.

​आरोग्य संचालकांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिटसाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री पुरवणे आणि रिक्त पदे भरण्याबाबत चार आठवड्यांच्या मुदतीचे हमीपत्र दिले होते. याशिवाय हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘सी-आर्म’ मशिनरी आठ आठवड्यांच्या आत उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही आरोग्य विभागाने हमीपत्राद्वारे दिले आहे.

​दरम्यान, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाने दिलेले मुदत-हमीपत्र असले तरी अद्याप या ठिकाणी कायमस्वरूपी पदावर कोणताही नवीन वैद्यकीय अधिकारी प्रत्यक्षात हजर झालेला नाही. या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट खंडपीठातील सुनावणीकडे आणि न्यायालय याबाबत काय निर्देश देते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.