शाळेने दिलेले शिक्षण-संस्कार आजही माजी विद्यार्थ्यांच्या आचरणात

शिरगाव हायस्कूलच्या १९८६-८७ दहावीच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या विकासासाठी १ लाख ५० हजारांचा धनादेश

शिरगाव (प्रतिनिधी) :
शिरगाव हायस्कूलच्या सन १९८६-८७ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेशी असलेले ऋणानुबंध आणि जिव्हाळा जपत शाळेच्या विकासासाठी तब्बल १ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द केला. अनेक वर्षांनंतरही ‘ही माझी शाळा’ ही भावना मनात जपत माजी विद्यार्थ्यांनी घेतलेला हा पुढाकार शाळा व संस्थेसाठी प्रेरणादायी ठरला.

यावेळी बोलताना विजयकुमार कदम यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. शाळा व संस्थेने दिलेले शिक्षण, संस्कार आणि शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण घडविते. अनेक वर्षे लोटली तरी हे संस्कार माजी विद्यार्थ्यांच्या आचरणातून दिसून येतात. ‘ही माझी शाळा’ ही भावना आजही त्यांच्या मनात कायम आहे, हे या देणगीतून स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले.

मुख्याध्यापक उदयसिंह रावराणे यांनी प्रास्ताविक करत माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या देणगीबद्दल संस्थेच्या वतीने आभार मानले. गणेशोत्सवाच्या दिवसांतही वेळ काढून माजी विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन हा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले. शाळेने दिलेल्या संस्कारांचे ऋण मान्य करून शाळेच्या विकासात योगदान देणे ही माजी विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी असून, हा उपक्रम इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी संदीप साटम, रघुनाथ चव्हाण आणि गणपत तावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करत शाळेशी असलेले ऋणानुबंध व जिव्हाळा व्यक्त केला.

सत्यपाल लाडगावकर यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. ज्या शाळेने शिक्षण, संस्कार आणि आयुष्याची जडणघडण घडविली, त्या शाळेचे ऋण काही अंशी फेडण्याच्या भावनेतून हा निधी देण्यात आला आहे. शाळेच्या विकासासाठी भविष्यातही असे उपक्रम राबविण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम, मानद अधीक्षक संदीप साटम, सरचिटणीस रघुनाथ चव्हाण, सहसेक्रेटरी पंडित तावडे, कार्यकारिणी सदस्य हेमंत देसाई, मिलिंद साटम, अमित साटम, शाळा समितीचे चेअरमन विजय कदम, सदस्य मंगेश लोके, मुख्याध्यापक उदयसिंह रावराणे, माजी विद्यार्थी सुधीर साटम, सत्यपाल लाडगावकर, रवींद्र डांगवे, गणेश आईर, संतोष तावडे, महानंदा सतरकर, वासंती जाधव, राजेंद्र साटम आदी उपस्थित होते.