आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते शालेय वाहनाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न
कणकवली : वारगाव विकास मंडळ मुंबई संचलित शेठ महादेव वि. केसरकर माध्यमिक विद्यालय, वारगाव यांच्या शालेय वाहनाचा लोकार्पण सोहळा आमदार प्रमोद जठार यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयी-सुविधांमध्ये भर घालणाऱ्या या शालेय वाहनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी वारगाव माध्यमिक प्रशालेच्या वतीने आमदार प्रमोद जठार यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रमोद जठार यांनी ग्रामीण भागातील शाळांचे महत्त्व अधोरेखित केले. “कोकणात जिल्हा परिषद तसेच ग्रामीण भागातील शाळा टिकवणे ही काळाची गरज आहे. आपल्या गावातील शाळा सुरू ठेवणे आणि ती अधिक सक्षम करणे ही केवळ शासनाची नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. गावची शाळा टिकली तर गावातील विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित राहील,” असे प्रतिपादन त्यांनी केले. ग्रामस्थांनी व चाकरमानी यांनी शाळेला दिलेले वाहन त्यांचे ही कौतुक केले.
शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी शाळांना आवश्यक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे सांगत, शालेय वाहनासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना मोठी सुविधा मिळते, असेही त्यांनी नमूद केले. शाळेच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास विजय केसरकर, ॲड. श्रीकांत नारकर, अरुण ताम्हकणकर, प्रथमेश राऊत, सुधाकर नर, सुधीर शेट्ये, मुख्याध्यापक वाळके सर, कुबडे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, नागरिक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्यामुळे वारगावच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा आणि विद्यार्थ्यांच्या सुविधांना नवे बळ मिळाले आहे.













