पटवर्धन चौक भाजी मार्केट परिसरातील घटना; १० हजारांचा मुद्देमाल लंपास
कणकवली : नगरपंचायतीच्या मालकीचा १ एचपी सबमर्सिबल पंप आणि घंटागाडीची बॅटरी असा एकूण १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना पटवर्धन चौक येथील भाजी मार्केट परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ घडली. याप्रकरणी नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्या सोनाली वामन खैरे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाली खैरे या सन २०२३ पासून कणकवली नगरपंचायतीमध्ये पाणीपुरवठा अभियंता म्हणून कार्यरत आहेत. नगरपंचायतीच्या अखत्यारित असलेल्या शासकीय वस्तूंची देखभाल व जबाबदारी त्यांच्या कामाचा भाग आहे. १४ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.४५ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
१५ सप्टेंबर रोजी सकाळी सफाई कामगार सुजन मुणगेकर हे सार्वजनिक शौचालयाजवळ गेले असता, पाणी पुरवठ्यासाठी ठेवण्यात आलेला १ एचपी सबमर्सिबल पंप तेथे दिसून आला नाही. त्यांनी याबाबतची माहिती अभियंता सोनाली खैरे यांना दिली. त्यानंतर खैरे यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी केली असता पंपासह घंटागाडीची बॅटरीही चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये ७ हजार रुपये किमतीचा १ एचपी सबमर्सिबल पंप आणि एमएच ०७ एजे ३९४७ क्रमांकाच्या घंटागाडीची ३ हजार रुपये किमतीची ऍम्ब्रॉन कंपनीची बॅटरी यांचा समावेश आहे. अज्ञात चोरट्याने नगरपंचायतीच्या मालकीचा एकूण १० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद सुपल पुढील तपास करीत आहेत.












