सागरी सीमा मंच, रत्नागिरीचा पुढाकार — स्वच्छ किनारा, सुरक्षित सागर ही सामूहिक जबाबदारी
रत्नागिरी : समुद्र हा कोकणच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. रत्नागिरी जिल्ह्याची अर्थव्यवस्था, मच्छीमारी, पर्यटन, स्थानिक संस्कृती आणि हजारो कुटुंबांची उपजीविका समुद्राशी जोडलेली आहे. त्यामुळे समुद्र आणि समुद्रकिनारा स्वच्छ ठेवणे ही केवळ पर्यावरणाची बाब नसून सामाजिक, आर्थिक आणि भविष्यातील पिढ्यांशी संबंधित जबाबदारी आहे. याच भूमिकेतून सागरी सीमा मंच, रत्नागिरी यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था, मच्छीमार, युवक आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून “स्वच्छ सागर अभियान” राबविण्यात येत आहे.
सप्टेंबर महिन्यातील तिसऱ्या शनिवारी जागतिक किनारपट्टी स्वच्छता दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने कोस्ट गार्ड व भारत सरकारच्या संबंधित मंत्रालयांच्या माध्यमातून देशभर किनारपट्टी स्वच्छता अभियान राबविले जाते. सन 2022 पासून सीमा जागरण मंचाच्या माध्यमातून देशभर हा उपक्रम राबविला जात असून, कोकण प्रांतात सागरी सीमा मंच व सहयोगी संस्था या अभियानाला व्यापक जनसहभागाचे स्वरूप देत आहेत.
स्वच्छ सागरची मूळ संकल्पना
‘स्वच्छ सागर’ म्हणजे केवळ समुद्रकिनाऱ्यावर पडलेला कचरा उचलणे नव्हे. कचरा समुद्रात जाण्यापूर्वीच रोखणे, त्याचे योग्य वर्गीकरण करणे, पुनर्वापर व पुनर्चक्रण वाढवणे आणि नागरिकांच्या दैनंदिन वर्तनात सकारात्मक बदल घडवणे, ही या अभियानाची मूळ संकल्पना आहे.
समुद्र स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ शासनाची किंवा एखाद्या स्वयंसेवी संस्थेची नाही. मच्छीमार, स्थानिक नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, पर्यटक, ग्रामपंचायत, नगरपालिका आणि सामाजिक व पर्यावरण संस्थांनी एकत्र येऊन ही जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे.
दक्षिण रत्नागिरीतील २० समुद्रकिनाऱ्यांवर अभियान
दि. १९ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत दक्षिण रत्नागिरीतील रत्नागिरी व राजापूर तालुक्यांमधील एकूण 20 विविध समुद्रकिनाऱ्यांवर या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी शहरातील भाट्ये समुद्रकिनारी 19 सप्टेंबर रोजी कोस्ट गार्ड व शासनाच्या विविध विभागांच्या सहभागातून अभियान स्वतंत्रपणे राबविण्यात येणार आहे. यात मंचाचा सक्रिय सहभाग असणार आहे. तर सागरी सीमा मंच विविध संस्थाच्या गौरी-गणपती विसर्जनानंतरच्या दुसऱ्या दिवशी, २० सप्टेंबर रोजी मांडवी किनाऱ्यावर स्वच्छता अभियान होणार आहे.
तसेच अनंतचतुर्दशीनंतर २६ सप्टेंबर रोजी पांढरासमुद्र, नांदिवडे व संदखोल (जयगड), वरवडे, मालगुंड, गणपतीपुळे, आरे, काळबादेवी, मिऱ्या-शिवलकरवाडी, मिऱ्या-पाटीलवाडी, कुर्ली, वायंगणी, रनपार, गणेशगुळे, पूर्णगड, गावखडी तसेच राजापूर तालुक्यातील वेत्ये, कशेळी, आंबोळगड आणि नाटे या ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायती, विविध महाविद्यालये, शाळा, सामाजिक संस्था व मंडळांच्या सहभागातून अभियान राबविण्यात येणार आहे.
समुद्रात कचरा येतो कुठून?
समुद्रकिनाऱ्यावर आढळणारा कचरा अनेक स्रोतांमधून येतो. घरगुती प्लास्टिक, खाद्यपदार्थांची पाकिटे, बाटल्या, थर्माकोल, प्लास्टिक पिशव्या आणि इतर घनकचरा नाल्यांमधून किंवा पावसाच्या पाण्याबरोबर समुद्रात येतो. याशिवाय मासेमारी व्यवसायातील जुनी जाळी, दोर, प्लास्टिक क्रेट, पॅकिंग साहित्य आणि इतर साहित्य समुद्री कचऱ्याचा भाग बनतो. नदी, खाडी आणि ओढ्यांमधून वाहून येणारा कचरा, समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटनामुळे निर्माण होणारा कचरा आणि काही ठिकाणी होणारे अनधिकृत कचरा टाकणे हीदेखील महत्त्वाची कारणे आहेत. म्हणूनच केवळ समुद्रकिनारा साफ करण्यापेक्षा कचऱ्याचा स्रोत शोधून त्यावर नियंत्रण ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे.
पूर्वतयारी आणि जनसहभागावर भर
अभियानाच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून संबंधित समुद्रकिनाऱ्यांची पाहणी, कचऱ्याचे प्रमुख Hotspots, कचऱ्याचे प्रकार आणि त्याचे संकलन व विल्हेवाट याबाबत नियोजन करण्यात येत आहे. स्वच्छता साहित्य, हातमोजे, कचरा संकलन पिशव्या, वर्गीकरणाची व्यवस्था आणि संकलित कचऱ्याच्या वाहतुकीचे नियोजनही करण्यात आले आहे.
या अभियानासाठी समुद्र स्वच्छतेच्या विषयात काम करणाऱ्या समाजातील विविध व्यक्तींची समिती स्थापन करण्यात आली असून या स्वच्छता अभियान समिती प्रमुख – श्री. संजीव लिमये, स्वच्छता अभियान सह प्रमुख श्री. सुहास ठाकूर देसाई असणार आहेत. याबरोबरच अभियान राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक समुद्रकिनाऱ्यासाठी ‘किनारा (बीच) प्रमुख’ निश्चित करण्यात आले आहेत. शासनाच्या विविध विभागांशी संपर्क साधण्यात आला असून, समाजातील विविध संस्था व घटकांशी प्रत्यक्ष संपर्क करून अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जनजागृती हाच अभियानाचा आत्मा
“कचरा समुद्रात जाऊ देऊ नका” हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. केवळ एक दिवस किनारा स्वच्छ करून हा प्रश्न सुटणार नाही. कचरा समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी नागरिकांच्या सवयींमध्ये बदल घडवणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, सिंगल व एकूणच प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि समुद्रकिनाऱ्याबाबत आपली सामूहिक जबाबदारी ओळखणे ही या अभियानाची पुढील दिशा आहे.
स्वच्छ सागर अभियानाचा खरा उद्देश एका दिवसात हजारो किलो कचरा उचलणे एवढाच नसून, पुढील वर्षभर समुद्रात कचरा जाऊ नये अशी व्यवस्था आणि सामाजिक सवय निर्माण करणे हा आहे. रत्नागिरीच्या समुद्राशी आपले नाते केवळ आर्थिक नाही, तर भावनिक आणि सांस्कृतिकही आहे. त्यामुळे “स्वच्छ सागर, सुरक्षित सागर; स्वच्छ किनारा, समृद्ध कोकण” हा संदेश जनमानसात रुजविण्यासाठी सागरी सीमा मंचाच्या माध्यमातून हे अभियान व्यापक लोकसहभागातून पुढे नेण्यात येणार आहे.










