देवरूख (प्रतिनिधी)
देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार श्री. विलास विजय रहाटे नेहमी वेगवेगळ्या स्वरूपात देवदेवतांची चित्ररूपी सेवा करत असतात. यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी बाप्पांच्या सेवेकरिता विलास रहाटे यांनी गणपती बाप्पांना अतिप्रिय असणाऱ्या मोदकावर अष्टविनायकांची विविध रूपे आकर्षक पद्धतीने साकारली आहेत.
तांदळाच्या शुभ्र पिठापासून लहान मोदक तयार करून, ॲक्रेलिक रंगाच्या साह्याने अष्टविनायकांची आकर्षक छबी साकारली आहे. यापूर्वी विलास यांनी तांदळापासून अक्षतांवर, तसेच सुपारीवर गणरायांची विविध रूपे साकारली आहेत. श्री. विलास रहाटे यांनी यावेळच्या अष्टविनायकांमध्ये महडचा वरदविनायक, थेऊरचा चिंतामणी, ओझरचा विघ्नेश्वर, मोरगावचा मयुरेश्वर, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, पालीचा बल्लाळेश्वर, लेण्याद्रीचा गिरीजात्मक व रांजणगावचा महागणपती साकारून गणेश भक्तांकडून शाबासकी मिळवली आहे. यापूर्वीही अध्यात्माच्या ओढिने विलास यांनी श्री विठ्ठल, श्री स्वामी समर्थ, श्री महालक्ष्मी, विविध ग्रामदेवता आणि इतर विविध देवदेवतांच्या आकर्षक रचना रांगोळी व चित्रकलेच्या सहाय्याने हुबेहूब जिवंत करून रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे.










