रत्नागिरी ः प्रतिनिधी
पूर्वीच्या टेंडरसाठी वापरलेल्या स्टँप पेपरच्या पीडीएफ फाईलमध्ये फेरफार करत महावितरणची तीन नवीन टेंडर मिळवण्यासाठी त्याचा वापर करत फिर्यादीची दिशाभूल केल्याप्रकरणी संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 28 एप्रिल 2025ते 17 जून 2025 या कालावधीत घडली आहे.
संतोष मनोहर फटे (44,रा.मंगळवेढा,सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात अनुराधा सुरेशराव आंधनसरे (45,मुळ रा.नाशिक सध्या रा.थिबा पॅलेस,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सन 2025 मध्ये शांताई कन्स्ट्रक्शनचा प्रोप्रायटर संतोष फटे याने पूर्वीच्या टेंडरसाठी वापरलेल्या स्टँप पेपरची पिडीएफ फाईल एडीट करुन त्यात कामाचे नाव बदलले. त्यानंतर त्याची प्रिंट काढून त्यावर नव्या टेंडरचा मजकूर लिहून सदर टेंडर मिळवण्यासाठी व फिर्यादीची दिशाभूल करण्यासाठी त्याचा वापर करुन महावितरणच्या तीन टेंडरसाठी डिक्लरेशन बॉन्ड म्हणून महावितरणच्या संकेतस्थळावर वापरला. ही बाब फिर्यादीच्या निदर्शनास येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत मंगळवार 28 जुलै रोजी तक्रार दिली. याप्रकरणी अकधि तपास शहर पोलिस करत आहेत.











