देवरूख (प्रतिनिधी)
समाजाचा दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा, रोजच्या जगण्यात दिव्यांगांना येणाऱ्या अडचणींची जाण यावी यासाठी देवरूख शिक्षण प्रसारक मंडळांनी शताब्दी वर्षानिमित्त देवरूखमध्ये प्रथमच जिल्हास्तरीय ‘सहसंवेदना सजगता कार्यशाळा”(Empathy Awareness Workshop) आयोजित केली आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या संस्था व संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, दिव्यांग मुलांचे पालक व कुटुंबीय, विशेष शिक्षक, समुपदेशक, आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, समाजशास्त्राचे विद्यार्थी तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक आणि संवेदनशील नागरिक यांच्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
दिव्यांग क्षेत्रात गेली ३० वर्षे कार्यरत असणाऱ्या स्वागत थोरात यांची ही संकल्पना असून, तेच कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शकही आहेत. कार्यशाळेच्या समन्वयक पुण्याच्या सौ. स्वरूपा गोखले-देशपांडे असून त्या व देवरूखच्या रेवा कदम या सहाय्यक प्रशिक्षक आहेत. तर कार्यशाळेच्या संयोजक डॉ. वर्षा शिरीष फाटक आहेत. ही एक दिवसीय कार्यशाळा बुधवार दि. २३ सप्टेंबर, २०२६ रोजी सृजन सायन्स अँड इनोव्हेशन सेंटर, सावरकर चौक, देवरुख येथे सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत असणार आहे. या कार्यशाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे, तर इतरांसाठी माफक ५०/- रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
कार्यशाळेमध्ये अपंगत्वाचे विविध प्रकार व त्यांतील आव्हाने, Sympathy (दया) नव्हे तर Empathy (सहसंवेदना) विकसित करण्याचे महत्त्व, सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, ज्ञानेंद्रियांचा प्रभावी वापर, सांघिक भावना विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ पालक,गुरुजन व नागरिकांशी कशाप्रकारे संवाद साधावा, समावेशकता यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विविध अनुभवाधारित उपक्रम, प्रात्यक्षिके आणि सहभागात्मक सत्रांचाही समावेश आहे. नांव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी 9405069246 या मोबाईल क्रमांकावर किंवा कार्यवाह श्री. शिरीष फाटक संपर्क क्रमांक 9405069236 यांच्याशी लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आवाहन देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. सदानंद भागवत व आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले आहे












