गणेशोत्सवाचा उत्सव अनेकांच्या संवादातून सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी साकारला!

भक्तिमय वातावरणात सातव्या दिवशी गणरायाला निरोप!

सिंधुनगरी : बाळ खडपकर

जिल्ह्याच्या प्रशासकीय प्रमुख म्हणून शिस्तप्रिय कार्यपद्धतीची ओळख निर्माण करणाऱ्या सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रशासन आणि समाजातील विविध घटकांमधील संवाद अधिक घट्ट केला. सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करून नागरिकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रित करत त्यांनी हा उत्सव प्रशासनाच्या चौकटीबाहेर नेला. यातून त्यांची माणुसकी, आपुलकी आणि भक्ती दिसली! या निमित्ताने त्यांनी अनेकांशी संवाद साधला. जनतेसाठी सरकार आहे, ही भावना केंद्रस्थानी ठेवत शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील साखळी अधिक मजबूत करण्याचा संदेश त्यांनी या गणेशोत्सवातून दिला!
एरवी प्रशासकीय कामात व्यस्त असणाऱ्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी हा गणेशोत्सव साजरा केला. कोकणात एकमेकांच्या घरी जाण्याची परंपरा पाहून आपल्याही घरी अनेकांनी यावे हे त्यांच्या मनात आले! व त्यामधून या संवादाचा अनोखा व आदर्श अनुभव त्यांना व अनेकांना घेता आला! राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, उपाध्यक्ष दादा साईल, पद्मश्री परशुराम गंगावणे, माजी आमदार परशुराम उपरकर, राजन तेली, ॲड अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा परिषद सदस्य सौ सुप्रिया वालावलकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरोस्कर, तरुण भारत संपादक शेखर सामंत या मान्यवरासह अनेक क्षेत्रातील नागरिक, लोकप्रतिनिधी यांनी या शासकीय निवासस्थानी प्रतिष्ठापना झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. सातव्या दिवशी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात या गणरायाचे विसर्जन करण्यात आले.

प्रशासन आणि जनता यांच्यातील संवाद जितका सहज आणि मोकळा, तितके विकासाचे निर्णय अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचतात. याच भावनेतून जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना निमंत्रित करून विविध क्षेत्रातील नागरिक, सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधी, पत्रकार, तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अनुभव जाणून घेत संवाद साधला. गणरायाच्या साक्षीने राजकीय मतभेद बाजूला ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येण्याची सकारात्मक भूमिका या निमित्ताने दिसून आली. गणराय हा एकात्मतेचे प्रतीक मानला जातो. त्याच भावनेतून जिल्हाधिकारी निवासस्थानी झालेला हा गणेशोत्सव एक वेगळेपण निर्माण करून गेला. सिंधुदुर्गच्या विकासासाठी सुरू झालेली ही संवादाची परंपरा पुढेही कायम राहावी, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त झाली.