ग्रामस्थांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन : गस्त वाढविण्याची मागणी
वेंगुर्ले : प्रतिनिधी
शिरोडा पंचक्रोशी परिसरात अमली पदार्थांची अवैध विक्री व सेवन होत असल्याचा आरोप करीत या प्रकाराला आळा घालून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिरोडा येथील ग्रामस्थांनी केली आहे. तसेच याबाबत ग्रामस्थांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शिरोडा गाव व परिसरातील शाळा-कॉलेज परिसर, पर्यटन क्षेत्र, मैदाने, स्मशानभूमी परिसर तसेच निर्मनुष्य ठिकाणी दिवस-रात्र काही असामाजिक घटकांकडून गांजा, चरस, एम.डी. (मेफेड्रोन) किंवा इतर अमली पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री व सेवन केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रकारामुळे परिसरातील तरुण, बेरोजगार युवा तसेच शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर व्यसनाचे गंभीर परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.
या वाढत्या घटनांमुळे संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या सुमारास संशयित इसमांच्या येण्या-जाण्यामुळे महिला व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या लोकांकडून परिसरामध्ये आपसात वाद तसेच चोरीसारख्या घटना घडण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
शिरोडा येथे नुकत्याच झालेल्या अमली पदार्थविरोधी पोलिस कारवाई दरम्यान मिळालेल्या संशयित आरोपींच्या पूर्व पार्श्वभूमीचा सखोल शोध घेऊन निष्पक्षपणे पोलीस तपास होणे गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
परिसराची सुरक्षा आणि तरुणांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी या प्रकरणी तातडीने लक्ष घालावे, संबंधित दोषी व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर एनडीपीएस कायदा (NDPS Act) अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच शिरोडा पंचक्रोशी परिसरातील पोलीस गस्त (पेट्रोलिंग) वाढवावी, अशी मागणी महादेव उर्फ अमित नाना गावडे, मयुरेश शिरोडकर, मनोज उगवेकर, राहुल गावडे व संतोष धानजी यांच्या सह ग्रामस्थानी निवेदनाद्वारे केली आहे.












