वैश्य वाणी समाजाला जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रक्रिया सुलभ

महायुती सरकारच्या निर्णयाचे रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाजाकडून स्वागत; डॉ. विकास शेट्ये यांचे शासनाचे आभार

मंडणगड प्रतिनिधी  : वैश्य वाणी समाजाला जात प्रमाणपत्र मिळविणे तसेच जात पडताळणीची प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने समाजातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाचे रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाजाने स्वागत केले असून, शासनाच्या निर्णयाबद्दल जिल्हाध्यक्ष डॉ. विकास शेट्ये यांनी शासनाचे आभार मानले आहेत.
सन २०१४ मध्ये वैश्य वाणी समाजाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून राज्य मागासवर्ग आयोगामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गामध्ये समाजाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर जात प्रमाणपत्र व जात पडताळणी करताना जुन्या पुराव्यांची आवश्यकता आणि कागदपत्रांमधील जात नोंदीतील तफावत यामुळे समाजातील नागरिकांना अडचणी येत होत्या.
या संदर्भात वैश्य वाणी समाजाच्या विविध संघटनांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. समाजातील नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून संबंधित मंत्री, अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडे निवेदने देण्यात आली. संगमेश्वर येथे झालेल्या बैठकीत वैश्य वाणी समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विकास शेट्ये यांनी या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केला. सामाजिक न्याय मंत्री संजय सावकारे यांच्याकडे मंत्रालयात सभा घेऊनही हा विषय मांडण्यात आला. त्यानंतर उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांच्यासह संबंधित मंत्री व लोकप्रतिनिधींकडेही समाजाच्या मागणीचा पाठपुरावा करण्यात आला.
दरम्यान, ९ सप्टेंबर २०२६ रोजी बहुजन कल्याण विभागाने याबाबत अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या निर्णयानुसार हिंदू वाणी, हिंदू वैश्य, वैश्य तसेच या समाजाशी संबंधित नोंदी असलेल्या नागरिकांना जात प्रमाणपत्र देताना आणि जात पडताळणी करताना प्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शासनाच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला समाजाचा प्रश्न मार्गी लागला असून, वैश्य वाणी समाजातील विद्यार्थी, नोकरी इच्छुक तसेच इतर लाभार्थींना जात प्रमाणपत्र व जात पडताळणी मिळविताना होणाऱ्या अडचणी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या निर्णयासाठी पाठपुरावा करणाऱ्या समाजबांधवांचे तसेच सर्व संबंधितांचे आभार मानत “महायुती सरकारने घेतलेला हा निर्णय समाजासाठी महत्त्वाचा असून, शासनाच्या प्रयत्नांना समाजाचे सहकार्य राहील,” असे डॉ. विकास शेट्ये यांनी सांगितले.