रत्नागिरी खेडशी रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने उभी करणाऱ्या दोन चालकांवर गुन्हा दाखल

रत्‍नागिरी ः प्रतिनिधी
शहरानजीकच्या कारवांचीवाडी फाटा ते खेडशी येथील रस्त्‍यावर इतर वाहनांच्या वाहतुकीला अडथळा व धोका निर्माण होईल अशा पध्दतीने वाहने उभी करणाऱ्या दोन चालकांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.45 ते 7.30 वा.कालावधीत करण्यात आली आहे.
योगेश नागेश रजपूत (43,रा.रविंद्रनगर कुवारबाव,रत्‍नागिरी) याने आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच-08-एक्यू-4198) तर सिध्दू सातलिंग कलशेट्ये (22,रा.मिरजोळे पाडावेवाडी,रत्‍नागिरी) याने आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एएच-6333) ही वाहने कारवांचीवाडी फाटा ते खेडशी येथील रस्त्‍यावर इतर वाहनांच्या वाहतुकीला अडथळा व धोका निर्माण होईल अशा पध्दतीने वाहने उभी केली होती. त्‍यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 285 प्रमाणे भादंवि कायदा कलम 283 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.