भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिल्याने उड्डाणपूलावर काम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू
लांजा (प्रतिनिधी) भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने लांजा शहरात उड्डाण पुलावर ड्रेनेज दुरुस्तीचे काम करणाऱ्या कामगाराला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज मंगळवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास लांजा शहरातील उड्डाणपुलावर पिलर क्रमांक ३ या ठिकाणी घडला. लांजा उड्डाणपूलावरील कामगाराचा पहिला बळी ठरला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेशोत्सवापूर्वीच शहरातील उड्डाणपूल हा वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला आहे. मात्र अद्यापही उड्डाणपूलावरील किरकोळ कामे सुरू आहेत. आज मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी गोपाल मुरमु (वय ४५ वर्षे राहणार द्वारहट्टा जिल्हा होगली राज्य पश्चिम बंगाल) हा कामगार उड्डाणपुलावर ड्रेनेज दुरुस्तीचे काम करत होता. याच दरम्यान गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या महिंद्रा कार (क्रमांक के ए ०३-एसी ३६००) ने या कामगाराला जोरदार धडक देत फरफटत नेले. ही महिंद्रा कार मौला कासम शेख (वय ३८ वर्षे राहणार मुरुगवाडा रत्नागिरी, मूळ राहणार आबावाडी अक्कलकोट जिल्हा सोलापूर) हा चालवत होता.
याबाबतची तक्रार राजशेखरन मुरुगन, वय ३४ वर्षे व्यवसाय प्रोजेक्ट मॅनेजर सीमा इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनी, राहणार तामिळनाडू) यांनी लांजा पोलिसांना दिली. रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने ,निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने चालवून ड्रेनेज दुरुस्तीचे काम करणाऱ्या कामगाराच्या गंभीर दुखापती, व मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी पोलिसांनी महिंद्रा कार चालक मौला कासम शेख याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५(अ), १२५( ब), २८१ ,मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४( ब)/ १७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव हे करत आहेत.












