मसुरे | झुंजार पेडणेकर :मसुरे कावा येथील ‘श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्ट’तर्फे मसुरे पंचक्रोशीतील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष शरद रावजी पेडणेकर यांनी आपल्या स्व. मातोश्री श्रीम. जयश्री रावजी पेडणेकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून हा ट्रस्ट शैक्षणिक, आरोग्यदायी व सामाजिक क्षेत्रात बहुमोल योगदान देत असून, वाडीतील अनेक गरजू घटकांना या ट्रस्टच्या माध्यमातून सढळ हस्ते मदत केली जात आहे.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना ट्रस्टचे अध्यक्ष शरद पेडणेकर यांनी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व अधोरेखित केले. आपल्या भाषणात ते म्हणाले, “आजच्या अत्यंत स्पर्धात्मक युगात केवळ पारंपरिक शिक्षण पुरेसे नाही. विद्यार्थ्यांनी शालेय वयापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी केली पाहिजे. स्पर्धा परीक्षांमुळे विचारसरणी प्रगल्भ होते आणि भविष्यातील मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. अपार कष्ट आणि योग्य नियोजनाच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रातील यश संपादन करता येते.” शरद पेडणेकर यांची शिक्षणाविषयीची ही तळमळ आणि आस्था उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रिया खोत यांनी केले, तर शाळा मसुरे कावाच्या मुख्याध्यापिका सौ. सुखदा मेहेंदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या सोहळ्याला ट्रस्टचे चिटणीस श्री. मिलिंद कांबळी, खजिनदार श्री. राजाराम खोत, मसुरे भंडारी समाज सेवा संघाचे अध्यक्ष श्री. किशोर पेडणेकर, परमानंद पेडणेकर, काशिनाथ पेडणेकर, मधुरा पेडणेकर, दीपक हिंदळेकर, गणेश पेडणेकर यांच्यासह सर्व पेडणेकर बंधू, शिक्षक श्री. प्रसाद कदम, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












