कोंबड्यांच्या खुराड्यात शिरलेल्या ९ फूट अजगराची सर्पमित्रांकडून सुटका

लांजा शहरा नजीकच्या धुंदरे येथील घटना

संतोष कोत्रे
लांजा -: गावठी कोंबड्यांच्या खुराड्यात शिरून कोंबड्या फस्त केल्यानंतर खुराड्यात अडकून पडलेल्या नऊ फुटी अजगराला सर्पमित्रांच्या सहाय्याने सुखरूप पणे बाहेर काढून त्याला वाकेड येथील सुरक्षित जंगलात सोडण्यात आले. ही घटना आज बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास लांजा धुंदरे येथील दुडये ऍग्रो फार्म या ठिकाणी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, लांजा शहरा नजीकच्या धुंदरे येथे सौ. ममता अनिल दुडये यांचे दुडये ऍग्रो फार्म आहे. या फॉर्ममध्ये असलेल्या गावठी कोंबड्यांच्या खुराड्यात बुधवारी सकाळी अजगर शिरला. त्यानंतर या अजगराने खुराड्यातील काही कोंबड्या फस्त केल्यानंतर तो त्याच ठिकाणी अडकून पडला होता. याबाबतची माहिती आमचे मालक दुडये यांना मिळाल्यानंतर सर्वांची सुरुवातीला घाबरगुंडी उडाली होती. मात्र त्यानंतर सावधगिरी बाळगत प्रसाद अनिल दुडये यांनी सर्पमित्र मंगेश पांचाळ यांना माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र मंगेश पांचाळ यांनी घटनास्थळी पोहोचून खुराड्यातून अजगराची काळजीपूर्वक सुटका केली. त्यानंतर या अजगराला वाकेड येथील जंगलात
सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.
सर्पमित्रांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अजगराची सुखरूप सुटका करण्यात आली. यावेळी
धुंदरे गावचे पोलीस पाटील विकास करंबेले, प्रसाद अनिल दुडये, प्रभाग क्र. १ च्या नगरसेविका सौ. निधी निलेश गुरव, नितीन करंबेळे, शैलेश पांचाळ आणि विठ्ठल कुळये उपस्थित होते.