आ. शेखर निकम यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण
चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) येथील विद्यार्थ्यांनी चिपळूण येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळाल्याने शाळेच्या शैक्षणिक तसेच सांस्कृतिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
गणेशोत्सवानिमित्त आयोजित प्रज्ञाशोध स्पर्धेत अमन स्वप्निल कांबळे व रिवांश विनायक वरुडे यांनी चौथा क्रमांक पटकावला, तर रेहांश नरेश चाळके याने पाचवा क्रमांक मिळविला. हस्ताक्षर स्पर्धेत आराध्या दिनेश कदम हिने चौथा क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपली गुणवत्ता सिद्ध केल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले. स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ, शिक्षिका मनिषा कांबळी व अपूर्वा शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहन दिले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षकवृंद व पालकांनी अभिनंदन केले. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा, कला, संस्कार, वाचन, वक्तृत्व तसेच विविध सर्जनशील उपक्रमांवर विशेष भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी शिक्षकांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या यशामुळे विद्यालयातील अन्य विद्यार्थ्यांनाही विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली आहे. “शिकूया, खेळूया आणि घडूया” या उद्देशाने शाळेची वाटचाल सुरू असून, या उपक्रमासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे श्री. बागवे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.












