वायंगणी गावासाठी रुग्णवाहिका उपलब्ध.
श्री मठ हरिचरणगिरी ट्रस्टचा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम
वेंगुर्ले : प्रतिनिधी
“आरोग्यसेवेला नवी दिशा… वायंगणीच्या सेवेसाठी सदैव सज्ज रुग्णवाहिका!”
श्री मठ हरिचरणगिरी ट्रस्टच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत वायंगणी गावासाठी प्रथम रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण असून, भविष्यात आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविण्यास मोठी मदत होणार आहे.
या रुग्णवाहिकेचे नारळ वाढवून लोकार्पण वायंगणी गावचे सरपंच दत्ताराम उर्फ अवी अरुण दुतोंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामस्थ, ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना सरपंच दत्ताराम उर्फ अवी दुतोंडकर म्हणाले, “वायंगणी गावासाठी प्रथमच रुग्णवाहिका उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थांसाठी ही अत्यंत समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे. अचानक उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक अडचणी, अपघात तसेच गंभीर रुग्णांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी या रुग्णवाहिकेचा मोठा फायदा होणार आहे.”
ही रुग्णवाहिका श्री. राजन ज्ञानदेव खानोलकर व कुटुंबीयांनी श्री मठ हरिचरणगिरी ट्रस्टच्या नावे दिली आहे. वायंगणी गावासाठी ही रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी ट्रस्टचे सचिव तथा खानोली सहकारी संस्थेचे चेअरमन प्रशांत कमलाकर प्रभू खानोलकर यांनी विशेष प्रयत्न केले.
सामाजिक बांधिलकी जपत वायंगणी गावासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच दत्ताराम उर्फ अवी दुतोंडकर यांनी श्री मठ हरिचरणगिरी ट्रस्ट, श्री. राजन ज्ञानदेव खानोलकर व खानोलकर कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
समाजाच्या गरजा ओळखून अशा प्रकारचे उपक्रम राबविल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनालाही निश्चितच हातभार लागणार असून, भविष्यातही ट्रस्टकडून वायंगणी गावाच्या विकासासाठी व ग्रामस्थांच्या हितासाठी असेच सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गावाच्या आरोग्यसेवेला बळ देणारा आणि सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम वायंगणी ग्रामस्थांसाठी निश्चितच मोलाची भर ठरणार आहे.
यावेळी श्री मठ हरिचरणगिरी ट्रस्टचे विश्वस्त मंडळ अध्यक्ष मिलिंद प्रभू खानोलकर, उपाध्यक्ष विवेक प्रभू खानोलकर, सचिव प्रशांत प्रभू खानोलकर, खजिनदार गुरुप्रसाद प्रभू खानोलकर, विश्वस्त विजय प्रभू खानोलकर, विश्वस्त सुनील प्रभू खानोलकर, विश्वस्त प्रशांत जनार्दन प्रभू खानोलकर, विश्वस्त अवधूत प्रभू खानोलकर, विश्वस्त गुरुदास प्रभू खानोलकर
तसेच ग्रामपंचायत सदस्य विनू मठकर यांच्यासह दादा केळूसकर, नवनीत मठकर, बंड्या खानोलकर, दाभोलकर, दिगंबर कसालकर, आत्माराम मठकर, विठ्ठल आंबडोस्कर, प्रशांत खानोलकर, प्रसाद खानोलकर, सुनील खानोलकर, कृष्ण कुडव, विशाल मठकर तसेच ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.












