अपघातात रिक्षाचालक गंभीर ; दोघे किरकोळ जखमी
न्हावेली:
मळेवाड हेदुलवाडी येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या समोर शनिवारी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास रिक्षा आणि बोलेरो पिकअप यांच्यात जोरदार अपघात घडला. या भीषण अपघातात रिक्षाचालक विनायक रंगनाथ बाळे (वय ४०, रा. आजगाव भोमवाडा) हे गंभीर जखमी झाले तर बोलेरो पिकअपमधील चालक आणि एक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक विनायक बाळे हे आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन रेल्वे स्टेशनवरून मळेवाडच्या दिशेने जात होते. त्यांची रिक्षा मळेवाड हेदुलवाडी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाख समोर पोहोचली असता, मळेवाडहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअपशी तिची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षा रस्त्यावरच पलटी झाली आणि चालक विनायक बाळे रस्त्यावर कोसळले. या अपघातात रिक्षेचे अत्यंत मोठे नुकसान झाले आहे.
अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक ग्रामस्थांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या बाळे यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून सावंतवाडी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच बोलेरो पिकअपमधील जखमी चालक व प्रवाशाला मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच आरोंदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करण्याचे काम सुरू केले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.












