सावंतवाडी वैश्यवाडा २१ दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवात सहस्र मोदक नैवेद्य

अंगारकी संकष्टीनिमित्त सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन

सावंतवाडी:सावंतवाडी येथील वैश्यवाडा येथे सुरू असलेल्या २१ दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवात यावर्षी संकष्टीचा योग अंगारक आल्याने विशेष धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी अंगारकी संकष्टीचे औचित्य साधून सामुदायिक अथर्वशीर्ष पठण आणि श्री चरणी सहस्र मोदक नैवेद्य अर्पण सोहळ्याचे अतिशय भव्य दिव्य वातावरणात आयोजन करण्यात आले आहे.

स्थानिक श्री हनुमान मंदिरात सुरू असलेल्या या गणेशोत्सवामध्ये मंगळवारी अंगारकी संकष्टीच्या पावन पर्वावर सकाळी ७:०० वाजता भाविकांच्या उपस्थितीत सामुदायिक अथर्वशीर्ष पठण होणार आहे. त्यानंतर दुपारी १:०० वाजता महाआरती संपन्न होईल आणि लागलीच बाप्पाच्या चरणी सहस्र मोदक अर्पण केले जाणार आहेत. अंगारकी संकष्टीचा दुर्मिळ योग साधून आयोजित केलेल्या या धार्मिक उपक्रमांमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या २१ दिवसांच्या गणेशोत्सवात दररोज भजनादी सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत आहेत. या कार्यक्रमांमध्ये धोंडी दळवी, म्हापसेकर बंधू, महादेव गावडे, उत्सव समिती, वैभव म्हापसेकर, शरद सुकी, महावीर चेंडके, गोट्या पांगम, अक्षय मयेकर मित्र मंडळ, राजेंद्र म्हापसेकर, प्रकाश मिशाळ आणि प्रकाश सुकी या कलावंतांनी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. याशिवाय उत्सवातील लघुरुद्र पूजा अण्णा म्हापसेकर यांच्या वतीने तर पंचखाद्य प्रसादाची सेवा डॉ. दादा केसरकर यांच्याकडून केली जाणार आहे.

या उत्सवाची सांगता भव्य विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी श्रींची आकर्षक देखावे आणि दरवर्षीप्रमाणे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जल्लोषात भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. वैश्यवाडा गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद कोदे यांनी या सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम व विसर्जन मिरवणुकीचा सर्व भाविकांनी भक्तिभावाने लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन केले आहे.