४०० विद्यार्थ्यांचा सहभाग; पाढ्यांच्या दुनियेत रमले विद्यार्थी
चिपळूण (प्रतिनिधी) : गणित विषयाची गोडी वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांची गणितीय पायाभूत कौशल्ये अधिक भक्कम व्हावीत, या उद्देशाने सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे शनिवार, दि. २६ सप्टेंबर रोजी गणित विषय समूहाच्या वतीने ‘गणित पाढे पाठांतर स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून इयत्ता ५ वी ते ७ वीच्या तब्बल ४०० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती दूर करून त्यांच्यामध्ये गणिताविषयी आवड, आत्मविश्वास आणि अचूक गणनकौशल्य निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेची सुरुवात वर्गस्तरावर करण्यात आली. प्रत्येक वर्गातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरी दोन गटांत घेण्यात आली. गट क्रमांक १ मध्ये २ ते ३० पर्यंत पाढे पाठ असणारे विद्यार्थी, तर गट क्रमांक २ मध्ये २ ते २० पर्यंत पाढे पाठ असणारे विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी वेग, अचूकता आणि आत्मविश्वासाने पाढे सादर करत स्पर्धेत रंगत आणली. या उपक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. राजेंद्रकुमार वारे यांची विशेष प्रेरणा लाभली. त्यांनी स्पर्धेस उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपमुख्याध्यापक विजय चव्हाण, पर्यवेक्षक तथा गणित शिक्षक श्री. महेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे परीक्षण प्रेरणा कदम, ज्योती निकम आणि स्फूर्ती जाधव यांनी अचूक व निष्पक्षपणे केले. स्पर्धेचे नियोजन गणित शिक्षक साजित चिकटे, अनंत डीके आणि गणेश बागवे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सकाळच्या सत्रातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच गणित विषय समूहातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेचा निकाल गट क्रमांक १- २ ते ३० पाढे गट प्रथम क्रमांक- भावेश देवेंद्र चव्हाण (इयत्ता ५ वी ब), द्वितीय क्रमांक गौरी विनेश वासकर (इयत्ता ५ वी ब), तृतीय क्रमांक मिनसा अबूबकर तांबे (इयत्ता ५ वी ब), तृतीय क्रमांक- समर्थ योगेश सोनवणे (इयत्ता ६ वी ब). गट क्रमांक २- २ ते २० पाढे गट- प्रथम क्रमांक दुर्वा सचिन चव्हाण, द्वितीय क्रमांक प्रिन्स नागेश ओळींबे (इयत्ता ५ वी ब), तृतीय क्रमांक शौर्य राकेश घाग, तृतीय क्रमांक दैवत रवींद्र घाणेकर. विजेत्या विद्यार्थ्यांसह स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद व पालकांनी अभिनंदन केले. पाढे पाठांतरासारख्या मूलभूत गणितीय कौशल्याला स्पर्धेची जोड देत विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.












