देवरूख महाविद्यालयात ‘एमयु-प्रज्ञा’ मानसशास्त्रीय मूल्यांकन उपक्रमाचा शुभारंभ

देवरूख (प्रतिनिधी):

विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, व्यक्तिमत्त्व व करिअरविषयक कल जाणून घेण्यासाठी मानसशास्त्रीय मूल्यांकनाचा शुभारंभ देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली ‘एमयु-प्रज्ञा’ या उपक्रमाद्वारे सुरू करण्यात आला आहे. ‘एमयू-प्रज्ञा (मुंबई युनिव्हर्सिटी–सायकोलॉजिल रेझिलियन्स असेसमेंट फॉर डेव्हलपमेंट अँड नर्चरिंग ऑफ यंग अडल्ट्स)’ या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, व्यक्तिमत्त्व, आवडी-निवडी, मानसिक लवचिकता तसेच करिअरविषयक कल समजून घेण्यास मदत करणे हा आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांना आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी ‘एमयू-प्रज्ञा टेस्ट’ मध्ये सहभागी होऊन चाचणी पूर्ण करावी, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले आहे. ही चाचणी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत असून विद्यार्थी ती महाविद्यालयातून तसेच घरूनही आपल्या सोयीच्या ठिकाणी शांतपणे पूर्ण करू शकतात. चाचणी देताना विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून आपल्या वास्तविक अनुभव, भावना, व्यक्तिमत्त्व आणि आवडीनुसार उत्तरे देणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना ही चाचणी सहज व अचूकपणे पूर्ण करता यावी यासाठी महाविद्यालयामार्फत स्टेप-बाय-स्टेप सोप्या सूचना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन चाचणीची प्रक्रिया समजून घेणे आणि ती पूर्ण करणे सुलभ होणार आहे. ‘एमयू-प्रज्ञा’ चाचणीमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य, व्यक्तिमत्त्व, आवडी-निवडी आणि संबंधित मानसशास्त्रीय बाबींचा विचार करणाऱ्या प्रश्नांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून प्रामाणिकपणे व स्वतःला लागू होईल अशा पद्धतीने उत्तरे देणे आवश्यक आहे. चाचणीमध्ये योग्य किंवा अयोग्य अशी उत्तरे नसून, विद्यार्थ्यांचे वास्तविक व्यक्तिमत्त्व व अनुभव समजून घेणे हा या मूल्यांकनाचा प्रमुख उद्देश आहे.

चाचणी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना इन्स्टंट रिपोर्ट जनरेट करून स्वतःचा अहवाल पाहता येणार असून तो डाउनलोड करून जतन करता येणार आहे. या अहवालामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू, आवडी तसेच इतर संबंधित बाबींबाबत प्राथमिक स्वरूपात माहिती मिळण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच मानसिक स्वास्थ्य, भावनिक स्थैर्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि योग्य करिअर मार्गदर्शनालाही महत्त्व आहे. ‘एमयू-प्रज्ञा’ उपक्रम विद्यार्थ्यांना स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या भविष्यातील विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन तसेच चाचणी प्रक्रियेचे योग्य समन्वयन करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर व उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातर्फे शिक्षक समन्वयक म्हणून प्रा. डॉ. सुभाष मायंगडे, प्रा. विकास शृंगारे व प्रा. पिया मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.