कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरील मांडवी एक्स्प्रेसमधून ओरोस ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या २६ वर्षीय तरुणीला प्रवासादरम्यान अचानक अस्वस्थ वाटू लागले. गुरुवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास मांडवी एक्स्प्रेस कणकवली रेल्वे स्थानकावर आल्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारांसाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सानिका पंढरीनाथ परब (वय २६) असे मृत तरुणीचे नाव आहे.
सानिका परब या मूळच्या वायंगवडे येथील रहिवासी असून, सध्या कांजूरमार्ग, मुंबई येथे वास्तव्यास होत्या. मुंबई येथून त्या कुटुंबीयांसह आपल्या मूळ गावी धार्मिक कार्यक्रमासाठी आल्या होत्या. गुरुवारी मांडवी एक्स्प्रेसने त्या पुन्हा मुंबईला परतत असताना प्रवासादरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले.
कणकवली रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. खासगी रुग्णालयातून पुढील उपचारांसाठी त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी केलेले प्रयत्न अपुरे ठरले.
सानिका यांना हृदयविकाराचा त्रास होता, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे. या घटनेची माहिती गुरुनाथ दिगंबर परब (विद्यानगर, मुंबई) यांनी पोलिसांना दिली. या दुर्दैवी घटनेमुळे परब कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.











