शेतात ट्रॅक्टर चालवताना नेमळे येथील ३४ वर्षीय युवक गंभीर

सावंतवाडी :
शेतामध्ये ट्रॅक्टर चालवत असताना अचानक झालेल्या अपघातात एका ३४ वर्षीय तरुणाला गंभीर दुखापत झाल्याची घटना सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथे घडली आहे. महेश गोविंद मेमन (वय ३४, रा. नेमळे) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
​मिळालेल्या माहितीनुसार, महेश मेमन हे बुधवारी सायंकाळच्या सुमारास शेतात ट्रॅक्टर चालवत होते. यादरम्यान अचानक त्यांचा ट्रॅक्टरवरचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने धाव घेत जखमी महेश यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
​रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर सुळेबावकर, डॉ. सबा लाड खान, डॉ. सपना सागर, डॉ. मयुरी इनामदार आणि परिचारिका स्नेहल एकावडे यांनी त्वरित प्राथमिक उपचार सुरू केले. उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांना आवश्यक ती औषधे व इंजेक्शन्स देऊन त्यांची प्रकृती स्थिर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
​मात्र, या अपघातात महेश यांच्या पायाला आणि लघवीच्या मार्गाला (गुप्तांगाला) अत्यंत गंभीर दुखापत झाली असल्याने, त्यांची गंभीर स्थिती पाहता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना पुढील उच्चस्तरीय उपचारासाठी गोवा-बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना तातडीने गोव्याकडे रवाना करण्यात आले आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजू मसुरकर यांनी या अपघाताबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.