शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय: अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती!

दोडामार्ग l सुहास देसाई :महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त कार्यालयाने सन २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. सन २०२५-२६ च्या संचमान्यता पोर्टलवरील कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याने, तसेच वारंवार समायोजन प्रक्रिया राबवण्याऐवजी एकदाच प्रक्रिया राबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे.

शिक्षण आयुक्त सचिनंद्र प्रताप सिंग यांनी २९ नोव्हेंबर २०२५ रोजी स्वाक्षरी केलेल्या पत्रानुसार, शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि प्राथमिक) स्तरावरून २० नोव्हेंबर २०२५ रोजी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत जे पत्र निर्गमित झाले होते, त्या पत्राला स्थगिती देण्यात आली आहे.

 

सध्या सन २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन डिसेंबर २०२५ मध्ये करण्याची योजना होती. मात्र, सन २०२५-२६ ची संचमान्यता लवकरच निर्गमित होणार आहे.२०२५-२६ च्या संचमान्यतेनंतर पुन्हा नव्याने अतिरिक्त शिक्षक निश्चित होतील. त्यामुळे दोनदा समायोजन प्रक्रिया राबवण्याऐवजी, २०२५-२६ ची संचमान्यता जाहीर झाल्यावर एकत्रितपणे आणि विहित कार्यपद्धतीनुसार समायोजन प्रक्रिया राबवणे अधिक योग्य ठरेल.

यापूर्वी, मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील याचिका क्र. ५४५६/२०२५ मधील निर्णयानुसार, शासन निर्णय १५ मार्च २०२५ अन्वये निर्गमित संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची सुधारित कार्यपद्धती अवलंबण्यास क्षेत्रीय अधिकाऱ्यांस कळविण्यात आले होते.

दरम्यान, शिक्षण संचालनालय पुणे आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, यांच्या आदेशानुसार सन २०२५-२६ ची संचमान्यता निर्गमित झाल्यानंतरच विहित कार्यपद्धतीनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल. या निर्णयामुळे शिक्षक संघटना आणि प्रशासकीय स्तरावरील काम अधिक सुव्यवस्थित होण्यास मदत मिळेल.