गौरव पोंक्षे माखजन:
चिपळूण शहरातील प्रभात रोड असलेला धुरळा आणि खड्डे यामुळे येथे राहणारे रहिवासी आणि वाहन चालक त्रस्त झाले आहेत.चिपळूण नगरपरिषदेचा कारभार निवडणूक झाल्यावर प्रभावी पणे सुरु होईल अशी अनेकांना आशा होती.पण अंतर्गत रस्त्यांच्या परिस्थितीत काहीच सुधारणा अद्याप झालेली दिसून येत नाही.
चिपळूण च्या प्रभात रोड वर कराड रोड कडून नारायण तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत डांबरीकरण झाले.परंतु पुढचा सुमारे १५० मीटर चा वगळण्यात आला.पावसाळ्यांत खड्डे भरण्यासाठी व नागरिकांच्या समाधानासाठी खड्ड्यात गिरिट टाकून मालमपट्टी करण्यात आली.यामुळे हेतू साध्य झाला नाहीच पण पाऊस थांबताच क्षणी गिरीट मुळे रस्त्यावर धुरळा झाला आहे.हा धुरळा गाड्यांच्या ये जा मुळे आजूबाजूच्या घराघरात जात आहे.याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे असे कित्येक वर्षे नागरिक मागणी करत आहेत.परंतु याकडे आजवर नगरपरिषद व लोकप्रतिनिधिंकडून दुर्लक्षच झाले आहे.
अवघ्या १५० मिटर रस्त्याच्या कायम स्वरूपी डागडुजीकडे लक्ष द्यायला चिपळूण नगरपरिषदेला वेळ नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.संबंधित रस्त्यांच्या धुळीचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी नगरपरिषदेकडून पाणी देखील मारले जात नसल्याने,नगरपालिकेला कर भरून नागरिकांना धुळीत राहावे लागत आहे.या १५० मीटर रस्त्याचे डांबरीकरण तात्काळ करण्यात यावे अशी मागणी होत आहे.











