नुकसानग्रस्त शेतीच्या पाहणीसाठी लोकप्रतिनिधी बांधावर

तातडीने पंचनामे करण्याच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

शिरगाव (प्रतिनिधी) :     पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी शिरगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी संदीप साटम यांनी उपस्थित कृषी अधिकारी व कृषी सहाय्यकांना नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

या पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषद सदस्य सावी लोके, देवदत्त कदम, शिरगाव पंचायत समिती सदस्य शीतल तावडे, तळवडे पंचायत समिती सदस्य सलोनी तळवडेकर, मिलिंद साटम, शेतकरी संतोष तावडे, उमेश घाडी, कृषी मंडळ अधिकारी डॉ. बापूसाहेब लांबाडे, कृषी सहाय्यक आदी उपस्थित होते.

शिरगाव परिसरातील विविध शेतांवर जाऊन पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या नुकसानीची माहिती लोकप्रतिनिधी व कृषी अधिकाऱ्यांना दिली.

नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सरसकट मदत मिळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने आवश्यक कार्यवाही करावी. तसेच नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, अशा सूचना जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी उपस्थित कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.