दुष्काळावर मात करण्यासाठी देवगडमध्ये १०० बंधारे उभारण्याचे नियोजन : अमित साटम

भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमित साटम यांची पत्रकार परिषद; जेसीबी मालकांना श्रमदानाचे आवाहन

देवगड : यावर्षी सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान कमी झाल्याने भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. भातशेतीवरही त्याचा परिणाम जाणवत असून, आगामी काळातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यातील विविध भागांमध्ये सुमारे १०० छोटे बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देवगड तालुका भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमित साटम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

यावेळी बोलताना अमित साटम म्हणाले की, जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी पाण्याचा योग्य वापर आणि पाणी बचतीचे आवाहन सातत्याने करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गावागावातील छोटे नाले, ओढे यामधून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा निसरा योग्य पद्धतीने करून घेतल्यास भूजलसाठा वाढण्यास मदत होऊ शकते. खाडी अथवा समुद्राकडे वाहून जाणारे पाणी शक्य तिथे अडवून त्याचा उपयोग स्थानिक पातळीवर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 

देवगड तालुक्यातील नगरपंचायत विभाग, कुणकेश्वर विभाग, किंजवडे विभाग आणि शिरगाव जिल्हा परिषद विभाग अशा चार भागांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. भाजपा पदाधिकारी, गावातील पदाधिकारी तसेच युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन श्रमदानातून बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 

स्वतःचा जेसीबी एका महिन्यासाठी मोफत देणार

 

या उपक्रमासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी अमित साटम यांनी स्वतःच्या मालकीचा जेसीबी एक महिन्यासाठी मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.

 

तसेच देवगड तालुक्यातील इतर जेसीबी मालकांनीही दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या गावातील ग्रामस्थांना वैयक्तिक मदतीच्या माध्यमातून सहकार्य करावे, असे आवाहन साटम यांनी केले. जेसीबीच्या माध्यमातून बंधारे उभारण्यास मदत केल्यास कमी वेळेत अधिक काम पूर्ण करून पाण्याचे स्रोत वाढविण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

 

या पत्रकार परिषदेला बाळ खडपे, तालुका सरचिटणीस योगेश चांदोसकर, युवा सेलचे शहराध्यक्ष दया पाटील, शहराध्यक्ष वैभव कळंगुटकर, नगरसेविका प्रणाली माने, मिलिंद साटम आणि उल्हास मनचेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.