वेंगुर्ले येथे ‘जिल्हास्तरीय “विज्ञान नाट्योत्सव २०२६ चे दिमाखात उद्घाटन…
वेंगुर्ले : दाजी नाईक
वैज्ञानिक दृष्टिकोन समोर घेऊन आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे वाटचाल करायची आहे. जिल्ह्यातील मुलांना वैज्ञानिक दृष्ट्या माहिती होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायन्स सेंटर असायला हवे. यासाठी मी प्रयत्न करीन. आपल्याकडे वेगळा निधी असतो जो आपण वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी वापरतो त्यासाठी आपण पालकमंत्री यांच्याशी बोलू. वेंगुर्ले मध्ये हे सेंटर झाले तर नगराध्यक्ष या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यासही तयार आहेत. त्यामुळे हे सेंटर नक्कीच सिंधुदुर्ग मध्ये होईल अशी ग्वाही माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले येथे बोलताना दिली.
शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी ‘जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा नाट्योत्सव वेंगुर्ला कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात पार पडला. या महोत्सवाचे उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार दीपक केसरकर बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, नगराध्यक्ष दिलीप गिरप, सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, तहसीलदार ओंकार ओतारी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, संजय गावडे, विजय नाईक तसेच उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजप वेंगुर्ले तालुका अध्यक्ष पप्पू परब, शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी, शहर प्रमुख अजित राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ अध्यक्ष पांडुरंग काकतकर, जिल्हा शिक्षणाधिकारी सुबोध माने, वेंगुर्ले गटशिक्षणाधिकारी अजय ढाणे, नगरसेवक प्रणव वायंगणकर, प्रीतम सावंत, रिया केरकर, गौरी माईणकर, पंचायत समिती सदस्य आपा फणसेकर, साक्षी नार्वेकर, शितल राऊत, सुचिता वजराटकर तसेच तुषार साळगावकर, सरपंच सत्यविजय गावडे, कमलेश गावडे यांच्यासह अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*विद्यार्थ्यांना या नाट्य महोत्सवातून विज्ञानाची वेगवेगळी अंग दाखवण्याचा प्रयत्न : दादा साईल*
विद्यार्थ्यांना या नाट्य महोत्सवातून विज्ञानाची वेगवेगळी अंग दाखवण्याचा प्रयत्न आहे. विज्ञानाचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो व चांगला असेल किंवा वाईट असेल त्याला कसे सामोरे जावे याचे मार्गदर्शन होणार आहे.
दरम्यान सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणीटंचाई रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनीही आपल्या परीने प्रयत्न करावे असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साहेब यांनी केले.शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ले पंचायत समिती सभापती शंकर घारे आणि नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
*सभापती प्रितेश राऊळ यांचे कौतुक*
जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ चांगले काम करत आहेत. निधीची तरतूद नसताना सभापती प्रितेश राऊळ यांनी विद्यार्थ्यांच्या मध्ये विज्ञानाविषयी जागृती होईल अशा या नाट्यमहोत्सवाचं आयोजन सहकाऱ्यांच्या सोबतीने वेंगुर्ले येथे घडवून आणला याबद्दल प्रितेश राऊळ यांचे विशेष कौतुक आहे असे सांगून आमदार दीपक केसरकर यांनी राऊळ यांच्या कामाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अध्यक्ष काकतकर यांनी तर सूत्रसंचालन जाधव मॅडम व आभार अजय ढाणे यांनी मानले.













