विकासकामांबद्दल ग्रामस्थांनी मानले आभार
शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही भरारी घेण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील पोफळी दुर्गम डोंगररांगांमध्ये वसलेल्या धनगरवाडीच्या विकासाला गेल्या काही काळात मिळालेली गती आणि त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवनमानात झालेला सकारात्मक बदल यानिमित्ताने आमदार शेखर निकम यांचा ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. वाडीतील विविध विकासकामांबद्दल ग्रामस्थांनी आमदार निकम यांचे आभार मानत आपल्या भावना व्यक्त केल्या.
कधीकाळी पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणाऱ्या धनगरवाडीमध्ये आज मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. रस्त्यांचे पक्कीकरण, पायवाटांचा विकास तसेच वीजसेवा अशा मूलभूत सुविधा दुर्गम भागापर्यंत पोहोचल्याने ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनातील अनेक अडचणी दूर झाल्या आहेत. विकासाची ही कामे प्रत्यक्षात साकार झाल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञतेची भावना दिसून आली. सत्काराला उत्तर देताना आमदार शेखर निकम यांनी ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी धनगरवाडीतील विविध प्रश्न, उपलब्ध सुविधा तसेच भविष्यातील गरजांचा आढावा घेतला. “मुलं शिकली पाहिजेत आणि मुलं खेळातही पुढे गेली पाहिजेत,” असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. दुर्गम भागातील मुलांमध्येही मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची क्षमता आहे. शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात योग्य संधी, मार्गदर्शन आणि सुविधा मिळाल्यास धनगरवाडीच्या मातीतूनही भविष्यातील गुणवंत खेळाडू घडू शकतात, असा विश्वास आ. निकम यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन उर्फ आबू ठसाळे तसेच बाबू साळवी यांनी मार्गदर्शन केले. “विकासकामे झाल्याचा आम्हाला आनंद आहे; मात्र आमच्या मुलांच्या हातात पुस्तक आणि खेळाचे साहित्य पाहणे, हाच आमच्यासाठी खरा विकास आहे,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त करत आ. शेखर निकम यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दुर्गम धनगरवाडीतील मूलभूत सुविधांचा विकास, ग्रामस्थांचा जिव्हाळ्याचा सत्कार आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याबाबत आमदारांनी दिलेला संदेश यामुळे हा कार्यक्रम केवळ सत्कारापुरता मर्यादित न राहता विकास, शिक्षण आणि क्रीडा या तिन्ही क्षेत्रांना दिशा देणारा ठरला.











