मंडणगड प्रतिनिधी : लाटवण आदिवासीवाडी येथे विद्युत तारेला स्पर्श झाल्याने दहा वर्षीय मुलाचा विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री घडली. या संदर्भात
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयूर अनिल पवार (वय १० वर्षे), रा. लाटवण आदिवासीवाडी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी हा ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ .०० वाजता घरातून कोयता घेऊन गेला होता. तो घरी परत न आल्याने दुपारी सुमारे २.०० वाजता त्याची आत्या लता घोगरेकर यांनी याबाबत कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी मयूरचा शोध सुरू केला.
शोध घेत असताना रात्री सुमारे ८.०० वाजण्याच्या सुमारास लाटवण हायस्कूलजवळ बांबूच्या बेटाजवळ असलेल्या इलेक्ट्रिक सिमेंटच्या पोलजवळ मयूर उताण्या अवस्थेत पडलेला दिसून आला. त्याच्या दोन्ही पायांमध्ये मुख्य लाईनची विद्युत तार चिकटलेली असल्याचे निदर्शनास आले.
विद्युत तारेला स्पर्श झाल्याने मयूरच्या दोन्ही पायांना गंभीर स्वरूपाच्या भाजल्यासारख्या जखमा झाल्या होत्या. विजेच्या धक्क्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
या घटनेची नोंद मंडणगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक १८/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये करण्यात आली असून, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे १.१८ वाजता दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे लाटवण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.













