मंडणगड : मंडणगड–वेळास मार्गावर मालेगाव येथील धोकादायक वळणावर मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास एसटी बसला अपघात झाला. वळणावर समोरून वाहन आल्याने चालकाने अचानक ब्रेक लावल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन गवतावरून घासत पुढे वॉल कंपाउंडच्या भिंतीला धडकली.

या बसमध्ये एकूण १२ प्रवासी असल्याची माहिती मिळाली असून, त्यापैकी तीन प्रवाशांना दुखापत झाली आहे. जखमींना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात एसटी बसचे मोठे नुकसान झाले असून, बसच्या समोरील भागाची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे. समोरील काच फुटली असून वाहनाचा पुढील भाग वाकला आहे. अपघातानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या कंपाउंडमध्ये अडकून पडली.
घटनेची माहिती मिळताच बाणकोट पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते.
अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.









