गुहागर प्रतिनिधी :
जिल्ह्यातील तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले असताना रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातही दुष्काळसदृश परिस्थितीची झळ शेतीला बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाअभावी भातशेतीसह राज्यातील विविध नाचणी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून, सध्या नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे.
गुहागर तालुक्यातील पालशेत-निवोशी परिसरात भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरु असताना सभापती प्रणव पोळेकर यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या पंचनाम्यांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी यासाठी आवश्यक पाठपुरावा आणि प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन सभापती प्रणव पोळेकर यांनी यावेळी दिले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी कृषी अधिकारी अमोल शिरसागर, ग्रामसेवक, शेतकरी तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. कृषी विभाग व स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.













