मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांचे तहसीलदारांना निवेदन
गुहागर प्रतिनिधी:
यंदाच्या हंगामात अपेक्षित पाऊस न झाल्याने गुहागर तालुक्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त अथवा दुष्काळसदृश जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने शासकीय – मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद गणेश जानवळकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी गुहागर तहसीलदारांना निवेदन दिले.
पावसाअभावी अनेक भागांतील – शेतजमिनीतील ओलावा कमी झाला असून भात, भाजीपाला तसेच अन्य पिकांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. पिकांचे उत्पादन घटल्याने शेतीवर – अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी झाले असून त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील पर्जन्यमान, पिकांची सद्यस्थिती आणि प्रत्यक्ष शेतीच्या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामे व सर्वेक्षण करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शासनाच्या निकषांनुसार गुहागर तालुका दुष्काळग्रस्त अथवा दुष्काळसदृश घोषित
करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. अशीही मागणी मनसेने केली आहे. यावेळी विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर, उपतालुकाध्यक्ष प्रसाद विखारे. गुहागर शहराध्यक्ष अभिजित रायकर, सामाजिक कार्यकर्ते महेश शिगवण, माजी शहराध्यक्ष नवनाथ साखरकर, मळण शाखाध्यक्ष मंगेश धामणस्कर यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
तसेच नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई, तातडीची आर्थिक मदत तसेच उपलब्ध दुष्काळ निवारण योजनांचा लाभ देण्यात यावा. प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा अहवाल जिल्हाधिकारी व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने पाठवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा विनोद जानवळकर यांनी व्यक्त केली.













