साळशी गावात हरिनामाचा गजर

पौराणिक चित्रदेखाव्याने जिंकली उपस्थितांची मने

अखंड हरिनाम सप्ताहाची काकड आरतीने सांगता

राजेंद्र साटम (शिरगाव)‘हरिनामाचा गजर होतो साळशी गावात…’, ‘विठ्ठल नामाची शाळा भरली…’, ‘विठूचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला…’, ‘पंढरीचा विठ्ठल विटेवरी…’ अशा भक्तिगीतांसह टाळ-मृदंगाचा निनाद आणि विठ्ठल नामाचा जयघोष यामुळे साळशी गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. या भक्तिमय वातावरणात येथील अखंड हरिनाम सप्ताहाची बुधवारी, ७ ऑक्टोबर रोजी पहाटे काकड आरतीने सांगता झाली.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि चौऱ्याऐंशी खेड्यांचे अधिपती असलेल्या देवगड तालुक्यातील साळशी येथील इनामदार श्री पावणाई देवालयात ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत हा हरिनाम सप्ताह उत्साहात पार पडला. हरिनाम सप्ताहानिमित्त देवालयात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, तर मंदिराचीही सुंदर सजावट करण्यात आली होती.

या हरिनाम सप्ताहात सुदर्शन भजन मंडळ, शिरगाव; गांगेश्वर प्रसादिक भजन मंडळ, चाफेड; पावणाई प्रासादिक भजन मंडळ, मठबुद्रुक; वेलकेश्वर प्रासादिक भजन मंडळ, ओंबळ-काजरवाडी; भालचंद्र महाराज मठ, कणकवली; फोंडकण देवी भजन मंडळ, निरोम; स्थानेश्वर प्रासादिक भजन मंडळ, भरणी-घाडीवाडी; विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ, मठबुद्रुक; रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ, कुवळे; महालक्ष्मी भजन मंडळ, रेंबवली; दुर्गामाता प्रासादिक भजन मंडळ, पराड-मालवण; कुलस्वामिनी भजन मंडळ, कोळोशी; गुरुमाऊली भजन मंडळ,

शिरगाव-निमतवाडी; सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ, कासार्डे; पावणाई बांदेश्वर प्रासादिक भजन मंडळ, रामनगर; हरिपाठ वारकरी संप्रदाय भजन मंडळ, वरेरी; गायगोठण गणेश प्रासादिक भजन मंडळ, चाफेड-भोगलेवाडी; गांगेश्वर सेवा मंडळ, शिरगाव-निमतवाडी; हेदूबाई भजन मंडळ, खुडी; रोहिलेवाडी भजन मंडळ, आयनल; आई कुलस्वामिनी प्रासादिक भजन मंडळ, चाफेड आणि ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळ, वरेरी आदी गावांतील भजनी दिंड्यांनी सहभाग घेतला.

हरिनाम सप्ताहाच्या सातव्या रात्री साळशी येथील श्री संत सिद्धेश्वर-पावणाई प्रासादिक भजन मंडळाने ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात रंगीत दिंडी काढली. यावेळी सादर करण्यात आलेला ‘वराह अवतार’ हा पौराणिक चित्रदेखावा विशेष आकर्षण ठरला. या देखाव्यात वराहाची भूमिका गणेश मिराशी, पृथ्वीची शौर्या साळसकर, ब्रह्माची अमेय माळवदे, इंद्राची सचिन माळवदे आणि हिरण्याक्षाची भूमिका दिनेश मणचेकर यांनी साकारली. तसेच प्रवीण नाडणकर, श्रेयस नाडणकर, सुहास कोदे आणि राजू घाडी यांनी आकर्षक वेशभूषा सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

हा पौराणिक चित्रदेखावा पाहण्यासाठी दशक्रोशीतील रसिकांनी मोठी गर्दी केली होती. चाकरमानी तसेच माहेरवाशिणींचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

हरिनाम सप्ताहाच्या कालावधीत सहभागी झालेल्या सर्व भजन मंडळांचे श्री देव सिद्धेश्वर-पावणाई इनाम देवस्थान ट्रस्ट, बारा-पाच मानकरी आणि साळशी ग्रामस्थांनी आभार मानले. सहभागी भजनी मंडळांसाठी चहा, लाडू तसेच महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

अखंड हरिनाम सप्ताहामुळे साळशी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. टाळ-मृदंगाचा निनाद आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने गावाचा परिसर दुमदुमुन गेला.