कोंडेतड येथे पाणीपुरवठ्याच्या कामासाठी जात असताना घडली घटना
राजापूर : प्रतिनिधी राजापूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेले कर्मचारी श्री. सचिन रहाटे यांच्या चालत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. या आगीत त्यांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, संपूर्ण वाहन जळून खाक झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन रहाटे हे सकाळी सात वाजताच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेस कोंडेतड येथील पाणीपुरवठा लाईन सोडण्याच्या कामासाठी जात होते. यावेळी त्यांच्या चालत्या वाहनाला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच राजापूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने वाहन पूर्णपणे जळून खाक झाले.
या घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती हाताळण्यास सहकार्य केले.

यावेळी राजापूर नगरपरिषदेचे वाहनचालक दिलीप तांबे, भूपेश कनेरी, मुकादम राजन जाधव, संदेश जाधव, साईकिरण कोठारकर, संदीप कुळी, प्रवीण शिंदे, निलेश बाणे आदी कर्मचारी उपस्थित होते.
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.













