डीबीजेचे प्रा. चेतन खांडेकर विद्यावाचस्पती

चिपळूण (प्रतिनिधी) : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयातील वाणिज्य विभागप्रमुख प्रा. चेतन खांडेकर यांना गोगटे कला व विज्ञान महाविद्यालय व आर. व्ही. जोगळेकर वाणिज्य महाविद्यालयातील (स्वायत्त) संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D.) पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचे लागू पेन्शन योजनेवर आधारित गुंतवणूक प्राधान्यक्रम या विषयावर संशोधन पूर्ण केले. त्यांना गोगटे- जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्राचार्य सीएमए डॉ. मकरंद साखळकर यांनी संशोधनकार्यात मार्गदर्शक म्हणून काम केले आहे.
चेतन खांडेकर हे गेली २२ वर्षे डीबीजे महाविद्यालय चिपळूण येथे लेखाशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक तसेच 4 वर्षांपासून लेखाशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. संशोधनामध्ये श्री चेतन खांडेकर यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या जुन्या व नवीन निवृत्तीवेतन योजनांनुसार मिळणाऱ्या लाभांचा अभ्यास करून, पेन्शन योजनेतील लाभांवर आधारित कर्मचाऱ्यांचे बदलणारे गुंतवणूक प्राधान्यक्रम याचा वैशिष्ट्यपूर्ण अभ्यास सादर केला आहे. जुन्या व नवीन निवृत्तीवेतन योजनेमधील मिळणाऱ्या लाभांबद्दल कर्मचाऱ्यांमधील जागरूकता, वृद्धापकाळासाठी तरतूद करण्याचे नियोजन, विमा खरेदी चे उद्देश व गुंतवणुकीतील जोखीम व्यवस्थापनाबद्दल मत याबद्दलचा अभ्यास श्री. खांडेकर यांनी प्रबंधांमध्ये मांडला आहे. कर्मचाऱ्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी शेअर मार्केट व म्युच्युअल फंडांचा परिपूर्ण अभ्यास करूनच हे पर्याय निवडावे असे मत त्यांच्या प्रबंधात मांडले आहे. तसेच शिस्तबद्ध पद्धतीने आर्थिक नियोजनाची गरज त्यांनी या अभ्यासातून अधोरेखित केली आहे. या अभ्यासातून विविध सरकारी खात्यांमधील जुन्या व नवीन निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांना गुंतवणूक विषयक, विमा विषयक पर्याय निवडण्यासाठी मदत मिळू शकते. पीएच.डी. पदवी प्राप्त करणे हे डॉ. चेतन खांडेकर यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि शैक्षणिक प्रवासातील महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे. या यशाबद्दल डॉ चेतन खांडेकर यांचे नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, नियामक समिती सदस्य व पदाधिकारी, प्राचार्यां डॉ.माधव बापट, उपप्राचार्य डॉ चेतन आठवले, उपप्राचार्य डॉ ऋचा खवणेकर, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव तसेच शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.