पतीची कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार
शोध घेऊनही पत्नीचा ठावठिकाणा लागेना
कणकवली : कणकवली तालुक्यातील कलमठ – नाडकर्णीनगर येथून महिला पोलीस हवालदार बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. स्मिता सचिन माने (वय ३८) असे त्यांचे नाव असून, त्यांचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांचे पती तथा कणकवली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई सचिन अशोक माने यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते ८ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने पत्नीचे अपहरण केल्याचा संशय त्यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे.
सचिन माने हे गेल्या सुमारे पाच वर्षांपासून कणकवली पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांची पत्नी स्मिता माने यादेखील कणकवली पोलीस ठाण्यात महिला पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होत्या. या दोघांचीही प्रशासकीय बदली कणकवली पोलीस ठाण्यातून वैभववाडी पोलीस ठाण्यात झाली होती. बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठी घरातील सामानाचे पॅकिंग करण्याच्या उद्देशाने दोघांनी ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी किरकोळ रजा घेतली होती.
८ ऑक्टोबर रोजी त्यांनी कलमठ येथील नाडकर्णीनगरमधील घरातील काही सामानाचे पॅकिंग केले. त्यानंतर रात्री जेवण करून सचिन माने, त्यांची पत्नी स्मिता आणि मुलगा सार्थक हे रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घरात झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता सचिन माने यांना जाग आली, त्यावेळी स्मिता या मुलगा सार्थक याच्या शाळेची तयारी करत होत्या. त्यांच्या अंगात हिरव्या रंगाचा गाऊन होता. सचिन माने यांना पुन्हा झोप लागल्यानंतर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ते उठले. त्यावेळी पत्नी घरात दिसून आली नाही.
पत्नीचा शोध घेण्यासाठी त्यांनी तिच्या मोबाईलवर फोन केला असता, मोबाईल घरातील हॉलमध्येच असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी घरात तसेच आजूबाजूच्या परिसरात पत्नीचा शोध घेतला. मुलगा सार्थक शिकत असलेल्या सेंट उर्सुला स्कूलमध्ये जाऊन चौकशी केली असता, स्मिता या शाळेत आल्या नसल्याचे समजले. मुलगा शाळेतच असल्याने सचिन माने यांनी कणकवली शहरातील विविध ठिकाणी पत्नीचा शोध घेतला. तसेच नातेवाईक आणि मित्रमंडळींकडे चौकशी केली. स्मिता यांचे वडील परशुराम पवार यांच्यासोबतही शोध घेण्यात आला; मात्र त्या मिळून आल्या नाहीत.
अखेर ९ ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान कलमठ-नाडकर्णीनगर येथील घरातून अज्ञात व्यक्तीने पत्नी स्मिता माने यांचे गुप्तपणे व गैरकायदेशीररीत्या अपहरण करून नेल्याचा संशय सचिन माने यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे. याप्रकरणी त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.













