मंडणगड प्रतिनिधी : दि १० डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मंडणगड येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशामुळे मंडणगड परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच क्रीडाशिक्षक संजय अवेरे व गौतम माने यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीतून विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली.या स्पर्धेत १४ वर्षांखालील वयोगटातील उंच उडी प्रकारात जागृती गणेश सापटे व यश चाचले यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच १९ वर्षांखालील मुलींच्या हातोडाफेक प्रकारात रिया रविंद्र जाधव हिने प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. याशिवाय १४ वर्षांखालील मुलींच्या ४×१०० मीटर रिले स्पर्धेत शाळेच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची जिद्द, मेहनत, नियमित सराव आणि क्रीडाशिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने शाळेचे नाव जिल्हास्तरावर उंचावल्याने संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.या यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशस्वी वाटचालीला नवी प्रेरणा मिळाली आहे.













