श्री समर्थ साटम महाराजांचा अलौकिक जीवनप्रवास ‘दाणोलीश्वर’च्या रूपाने मोठ्या पडद्यावर

चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; कमलवल्लभदास लिखित ग्रंथावर आधारित निर्मिती

सावंतवाडी । प्रतिनिधी :कोकणभूमीत श्रद्धा आणि भक्तीचे अढळ स्थान असलेल्या समर्थ शंकर साटम महाराज यांची जीवनगाथा आता पहिल्यांदाच चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर साकारली जाणार आहे. ‘दाणोलीश्वर : सद्गुरू श्री साटम महाराज’ असे नाव असलेल्या या अध्यात्मिक चित्रपटाचे आकर्षक पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटातून प्रेक्षकांना भक्ती, अध्यात्म आणि मनःशांतीचा परिपूर्ण अनुभव मिळणार आहे.
​महाकाली प्रॉडक्शन आणि स्मिता क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दाणोलीश्वर’ची निर्मिती केली जात असून, मिलिंद सावंत, सुषमा मिलिंद घोगळे सावंत आणि स्मिता घाग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर रणजित विठ्ठल चव्हाण हे सहनिर्माते आहेत. कमलवल्लभदास यांच्या ‘दाणोलीश्र्वर’ या पुस्तकाचा संदर्भ घेऊन पराग कुलकर्णी यांनी चित्रपटाचे कथालेखन केले असून, दिग्दर्शनाची जबाबदारी विराज राजे यांनी सांभाळली आहे.
​चित्रपटाला प्रातःस्मरणीय सद्गुरु चिटणीस बाबा (डॉ. शशिकांत चिटणीस) आणि परमपूज्य बाळूमामा दळवी (शिरसंगी) यांचे आशीर्वाद लाभले आहेत. तसेच दाणोली समाधी मंदिर ट्रस्ट विश्वस्त कार्यकारी मंडळ, बबी देवळे, श्रीमंत सरकार खेमराज शिवराम राजे सावंत भोसले आणि दाणोली बाजार तरुण मंडळ यांचे मोलाचे सहकार्य या निर्मितीसाठी लाभत आहे.
​सन १८८४ मध्ये अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जन्मलेल्या साटम महाराजांचा जीवनप्रवास मुंबईतील एका सामान्य व्यक्तीसारखा सुरू झाला; परंतु पुढे या प्रवासाला अथांग आध्यात्मिक वलय प्राप्त झाले. भारतभ्रमण केल्यानंतर महाराजांची पावले कोकणातील सावंतवाडीजवळील दाणोली या गावात स्थिरावली. सन १९३७ पर्यंतच्या वास्तव्यात त्यांनी अनेक अद्भूत लीला घडवून भाविकांच्या अडचणी दूर केल्या आणि मानवी जीवनाचे अंतिम सार व मूल्ये शिकवली. दाणोलीत समाधी घेऊन त्यांनी ही भूमी कायमस्वरूपी पावन केली. हीच जीवनगाथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे दिग्दर्शकांनी सांगितले.
​मराठीमध्ये आजवर संतांच्या जीवनावर अनेक चित्रपट आले असून, त्यात आता ‘दाणोलीश्वर’ची भर पडणार आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत कोण असणार हे अजून गुलदस्त्यात असले, तरी पोस्टरने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.