रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे मिळाले तातडीचे उपचार
देवरूख (प्रतिनिधी) :
कोकण रेल्वे मार्गावरील उक्षी येथे रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेची धडक बसून झारखंड राज्यातील ३३ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना १० ऑक्टोबर २०२६ रोजी घडली आहे. अपघातानंतर जखमी तरुण रेल्वे मार्गाजवळ गंभीर अवस्थेत पडून असताना रेल्वेच्या मोटरमनने दाखवलेली सतर्कता आणि संगमेश्वर रेल्वे स्थानकावरील पोलिसांसह होमगार्ड यांनी केलेल्या तातडीच्या मदतीमुळे त्याला वेळेत रुग्णालयात दाखल करणे शक्य झाले.
सुरंजन सानिका डुंगडुंग (वय ३३) असे जखमी तरुणाचे नाव असून तो झारखंड राज्यातील सिमडेगा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो के. प्रसाद यांच्या कंपनीत काम करत करत असल्याचे समजते. १० ऑक्टोबर रोजी तो निवळी येथील आठवडा बाजारात गेला होता. बाजारातील काम आटोपून परतत असताना उक्षी येथे रेल्वे मार्ग ओलांडण्याच्या वेळी त्याला रेल्वेची धडक बसली. या धडकेत तो गंभीर जखमी झाला आणि रेल्वे मार्गाजवळच पडून राहिला. दरम्यान, रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मंगला एक्सप्रेसच्या मोटरमनच्या नजरेस जखमी तरुण पडला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने तत्काळ संगमेश्वर रेल्वे स्थानकावर याबाबत माहिती दिली. या माहितीमुळे जखमी तरुणाला मदत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. त्यानंतर जखमी सुरंजनला रेल्वेच्या डब्यातून संगमेश्वर रेल्वे स्थानकावर आणण्यात आले.
मंगला एक्सप्रेस संगमेश्वर स्थानकात पोहोचताच तेथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी आणि होमगार्ड जवानांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला. पोलिस कॉन्स्टेबल मोरे, होमगार्ड जवान मुजीब डोंगरकर, सागर कांगणे, वाने, महिला होमगार्ड मांगले, यांनी जखमी तरुणाला मदत करण्यासाठी तत्परता दाखवली. छावा सामाजिक संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष वहाळ दळवी यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. रेल्वे स्थानकावर दाखवण्यात आलेली ही तत्परता जखमी तरुणासाठी महत्त्वाची ठरली. स्थानिकांच्या मदतीने त्याला १०८ रुग्णवाहिकेतून संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील उपचारांसाठी त्याला रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
रेल्वे मार्गाजवळ गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणाला वेळेत मदत मिळाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होऊ शकले. अपघातानंतर मोटरमनने दाखवलेली सतर्कता, रेल्वे स्थानकावरील पोलिस व होमगार्ड जवानांनी केलेली धावपळ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेली मदत यामुळे जखमी तरुणाला रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया वेगाने पार पडली. या घटनेतून आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर मिळणारी मदत किती महत्त्वाची असते, हे पुन्हा अधोरेखित झाले.













