महिला पोलीस हवालदार स्मिता माने मृत्यू प्रकरणाला नवे वळण

पती पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने विरोधात गुन्हा दाखल

 

शारीरिक व मानसिक छळासह घातपाताचा संशय

कणकवली : कणकवली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदार स्मिता सचिन माने यांच्या मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मयत स्मिता माने यांच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे पती सचिन अशोक माने यांच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार (बीएनएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीकडून वारंवार होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून स्मिता यांनी आत्महत्या केली असावी किंवा त्यांच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता असल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नवी बाजू समोर आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

महिला पोलीस हवालदार स्मिता माने या ९ ऑक्टोबरपासून कलमठ येथील राहत्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत त्यांच्या अपहरणाची फिर्यादही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा शोध सुरू असताना रविवार, ११ ऑक्टोबर रोजी दुपारी कणकवली तालुक्यातील बिडवाडी-हुंबरणे येथील गांगेश्वर मंदिराच्या मागील जंगलमय परिसरात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने पोलीस दलासह परिसरात खळबळ उडाली होती.

दरम्यान, स्मिता माने यांच्या बहिणी रेश्मा रवींद्र जाधव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार, सचिन माने हे स्मिता यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण करीत असत. ८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सचिन माने यांनी रेश्मा यांना मोबाईलवर फोन करून आपले आणि स्मिता यांचे भांडण झाल्याचे तसेच आपण स्मिता यांना मारहाण केल्याचे सांगितले होते, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी सचिन माने यांनी रेश्मा यांना पुन्हा फोन करून सकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान स्मिता घराबाहेर गेल्याचे सांगितले. यानंतर रेश्मा या आपल्या वडिलांसह कलमठ येथील सचिन आणि स्मिता राहत असलेल्या घरी गेल्या. त्यावेळी घरातील फरशीवर मोठ्या प्रमाणात केस पडलेले दिसल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या परिस्थितीवरून स्मिता यांना ८ ऑक्टोबरच्या रात्री जबर मारहाण झाली असावी आणि त्यानंतर त्या घरातून निघून गेल्या असाव्यात, असा संशय रेश्मा यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर स्मिता यांचा शोध घेण्यात येत होता.

या प्रकरणात स्मिता यांचा मुलगा सार्थक याने सांगितलेल्या कथित माहितीलाही फिर्यादीत महत्त्व देण्यात आले आहे. रेश्मा यांनी सार्थक याला त्या दिवशी स्वतःच्या घरी आणले असता, पप्पांनी रात्री मम्मीला पट्ट्याने मारले आणि त्यामुळे मम्मीला चक्कर येऊन त्या बाथरूममध्ये पडल्याचे त्याने सांगितले. या सर्व घटनांच्या आधारे स्मिता यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत रेश्मा जाधव यांनी स्मिता माने यांचे पती सचिन माने यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शारीरिक व मानसिक छळ तसेच मृत्यूमागे घातपात असण्याच्या संशयावरून पोलिसांनी संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

स्मिता माने यांच्या मृतदेहाचे ( आज ) सोमवार १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, महिला पोलीस हवालदार स्मिता माने यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, त्यांच्या मृत्यूमागे आत्महत्या आहे की अन्य काही घातपात, तसेच फिर्यादीत दिलेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, हे पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.