भाजपा चिपळूण शहर मंडल अध्यक्षपदी मकरंद उर्फ आशिष खातू

 प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याकडून निवडीची घोषणा

चिपळूण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या चिपळूण शहर मंडल अध्यक्षपदी मकरंद उर्फ आशिष चंद्रकांत खातू यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी ही निवड जाहीर केली.
यापूर्वी नगरसेवक म्हणून काम करताना शहराच्या विकासात योगदान देणारे तसेच भाजपा चिपळूण शहराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेले आशिष खातू यांच्यावर पक्षाने पुन्हा संघटनात्मक जबाबदारी सोपवली आहे. शहरातील पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, बूथ स्तरापर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवणे आणि प्रदेश व केंद्र कार्यालयाकडून दिलेल्या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, या दृष्टीने मंडल अध्यक्षपद महत्त्वाचे मानले जाते. पक्षातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन संघटनात्मक कामकाजाला गती देणे, जनतेशी संपर्क वाढवणे तसेच पक्षाचे उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मंडल अध्यक्षांवर असते. आशिष खातू यांनी यापूर्वी चिपळूण नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून काम केले आहे. शहराच्या विकासाशी संबंधित विविध कामांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. शांत, संयमी आणि अभ्यासू कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असून, यापूर्वी भाजपा चिपळूण शहराध्यक्ष म्हणून काम केल्यामुळे त्यांना संघटनात्मक कामाचा अनुभव आहे. पक्षातील कार्यकर्त्यांशी समन्वय राखणे आणि संघटनात्मक उपक्रम राबविण्याचा अनुभव लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना आशिष खातू म्हणाले की, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ ठरविण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची विचारधारा शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.