सावर्डे विद्यालयाची विभाग स्तरावर धडक

१० वैयक्तिक व ३ सांघिक क्रीडा प्रकारांत खेळाडूंची प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांची कमाई

चिपळूण (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने एस. व्ही. जे. सी. टी. क्रीडा संकुल, डेरवण येथे आयोजित १४ व १९ वर्षांखालील जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डेच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. विविध धावण्याच्या स्पर्धा, मैदानी क्रीडा प्रकार आणि रिले स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवत खेळाडूंनी विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या कामगिरीच्या जोरावर खेळाडूंची कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१९ वर्षांखालील गटात सागर शर्माची सुवर्ण भरारी १९ वर्षांखालील मुलांच्या गटात सागर शर्मा याने ३००० मीटर, १५०० मीटर आणि सहा किलोमीटर क्रॉस कंट्री धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले. अजिंक्य भाईजे याने थाळीफेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. पृथ्वी राजभर याने ८०० मीटर व १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला, तर सहा किलोमीटर क्रॉस कंट्री स्पर्धेतही त्याने विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. मुलींच्या गटात प्रांजल हुमणे हिने लांब उडी व तिहेरी उडीमध्ये द्वितीय क्रमांक, तर १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. वेदिका बामणे हिने उंच उडीमध्ये प्रथम क्रमांक, तर सृष्टी खेराडे हिने भालाफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळवत विद्यालयाच्या यशात भर घातली. ४×४०० मीटर रिले स्पर्धेत सागर शर्मा, पृथ्वी राजभर, विघ्नेश घाणेकर, श्रवण आग्रे व रोहन घाणेकर यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. १४ वर्षांखालील गटातही चमकदार कामगिरी १४ वर्षांखालील मुलींच्या गटात कस्तुरी घाग हिने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम, तर २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. ४×१०० मीटर रिले स्पर्धेत मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघात कस्तुरी घाग, सृष्टी कानसे, अदिती पाष्टे, अर्णवी चव्हाण व स्वरा राणिम यांचा समावेश होता. १४ वर्षांखालील मुलांच्या ४×१०० मीटर रिले स्पर्धेत अथर्व कानसे, रुद्र खापरे, सर्वेश खापरे, आर्यन घाणेकर व अथर्व बेचावडे यांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. या स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या पात्र खेळाडूंची कोल्हापूर विभागस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे विद्यालयातील खेळाडूंना विभागस्तरावर रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
या खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे व प्रशांत सकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आमदार शेखरजी निकम, उपाध्यक्ष प्रशांतशेठ निकम, युगंधरा राजेशिर्के, डॉ. इसाक खतीब, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव महेश महाडिक, संस्थेचे विश्वस्त व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, सर्व संस्था पदाधिकारी व शालेय समिती सदस्य तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण आणि पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांनी विजयी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. आगामी विभागस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.