चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील कळंबस्ते गुरववाडी गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दशरथ बाळाराम जाधव यांचे दि. ३ जुलै रोजी डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ५४ वर्षांचे होते.
दशरथ जाधव हे कळंबस्ते गावचे एक प्रमुख कार्यकर्ते होते. त्यांनी कळंबस्ते ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, काळेश्वरी कंचनी देवस्थान ट्रस्टचे सल्लागार, रिक्षाचालक मालक संघाचे सदस्य, भैरी भवानी मित्रमंडळाचे आधारस्तंभ ई.पदे भूषविली होती. शिवाय गावातील अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग होता. विशेष म्हणजे चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून परिचित होते. परोपकारी, मनमिळावू स्वभावाच्या जाधव यांच्या अचानक निधनाने साऱ्या गावात शोककळा पसरली असून त्यांच्या अंत्ययात्रेत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांचे उत्तरकार्य सोमवार दिनांक १४ रोजी त्यांच्या कळंबस्ते येथील राहत्या घरी होणार असून ७ दिवसांचा विधी दि. ९ रोजी होणार आहे. दिवंगत दशरथ जाधव यांच्या पश्चात त्यांचे २ बंधू, त्यांचा मुलगा, विवाहित मुलगी, विवाहित पुतणे, पुतण्या, नातू, भावजया व सुना, विवाहित बहिणी असा मोठा परिवार आहे.













