शहरासह तालुक्यात खळबळ
राजापूर प्रतिनिधी : एटीएस (दहशदवाद विरोधी पथक) नवी मुंबई व आयबी (भारतीय गुप्तचर विभाग) यांच्या पथकांनी सोमवारी सकाळी राजापुर शहरात छापा टाकत एकाच कुटुंबातील पती, पत्नी व मुलगी अशा तीन संशयीतांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सोमवारी सकाळी ७.३० वाजता या पथकाने ही धडक कारवाई केली असून या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे शहरासह तालुक्यात उलटसुलट चर्चांना वेग आला आहे.
मात्र या कारवाईबाबत या दोन्ही विभागांसह स्थानिक पोलीस प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळली असून सायंकाळी उशीरापर्यंत राजापूर पोलीस स्थानकात या पथकाकडून या तीन्ही संशयीतांची चौकशी करून त्यांना सोडण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
या कारवाईत या पथकांनी पती, पत्नी व त्यांची मुलगी अशा तीन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली आहे. एका आंतरराष्ट्रीय धार्मिक संघटनेशी संबधीत असलेल्या व्हाटस् अप ग्रुपशी या कुटुंबाचा संबध असल्याचा संशय असून त्यातुन या विभागांनी ही कारवाई करत या तीघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. मात्र याबाबात अधिकृत कोणतीही माहिती देण्यास संबधित विभागांनी व स्थानिक पोलीसांनी नकार दिला आहे. मात्र या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान एटीएस (दहशदवाद विरोधी पथक) नवी मुंबई व आयबी (भारतीय गुप्तचर पथक)राजापुरात दाखल झाले. गुप्तचर विभागाच्या पथकात रत्नागिरी जिल्हयातील स्थानिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सोमवारी सकाळी स्थानिक पोलीसांचे सहकार्य घेत या पथकाने शहरातील एकाच कुटुंबातील या तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. राजापूर पोलीस स्थानकात नेऊन यांची चौकशी सुरू करण्यात आली. सायंकाळी उशीरापर्यंत या पथकाकडून या तीघांचीही चौकशी सुरू होती.
या प्रकारानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक नितिन बगाटे यांनी देखील तात्काळ राजापूर पोलीस स्थानकाला भेट दिली. मात्र या एकूणच कारवाईबाबत या दोन्ही विभागांसह स्थानिक पोलीस प्रशासनानेही कमालीची गुप्तता पाळली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गुढ आणखी वाढले आहे.
गेल्या एक दोन वर्षात राजापूर शहरात घडलेल्या विविध घडामोडींमुळे राजापूर शहर हे जिल्हयात संवेदनशील शहर म्हणून पुढे आलेले आहे. त्यातच आता राजापूरात थेट एटीएस (दहशदवाद विरोधी पथक) व आयबी भारतीय गुप्तचर नवी मुंबई पथकाने छापा टाकून एकाच कुटुंबातील तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. सायंकाळी उशीरा या पथकाने या तीघांची चौकशी करून सोडले असल्याची माहिती पुढे आली आहे.













